बारामती : बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावांमध्ये आणि परिसरात कोथिंबिरीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या लॉकडाऊन शिथिल झाल्याने शेतमालाचे दर हे चांगलेच भडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या बाजारामध्ये कोथिंबिरीच्या एका पेंडीला 40 ते 45 रुपये मोजावे लागत आहेत, अशातच बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील शेतकरी अविनाश जगताप यांनी एक एकरवर लावलेली कोथिंबीर व्यापाऱ्याने तब्बल साडेचार लाख रुपयांना खरेदी केली आहे. त्यांना कोथिंबिरीचे उत्पादन घेण्यासाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च आला. तर त्यांना एकरी नफा हा सरासरी चार लाख रुपये मिळाला आहे.
रेन पाईपद्वारे पाण्याचे नियोजन
उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीरची लागवड करताना अनेक अडचणी येत असतात. जगताप यांनी लागवड करताना संभाव्य धोका ओळखून रेन पाईपद्वारे या कोथिंबिरीला पाण्याचे नियोजन केले. त्यामुळे त्यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात त्यांच्या कोथिंबिरीवर शॉवरसारखे पाणी पडत राहिल्याने पीक जोमात आल्याचे जगताप यांचे म्हणणे आहे. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गावामुळे येथे मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते. मात्र ऊस तोडून गेल्यानंतर राहिलेल्या शेतात येथील शेतकरी कोथिंबीरीची लागवड तसेच तरकारी करतात. मुबलक पाणी असल्यामुळे कोथिंबीरचे पीक जोमात येते.
एक महिन्यात 50 लाखांची उलाढाल
बारामती तालुक्यातील मुरुम आणि वाणेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी कोथिंबीर या पिकात या वेळी तब्बल 50 ते 55 लाख रुपये कमावले आहेत. ही बाब सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी असली तरी पण खरी आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तरकारी पिकाला समाधानकारक दर मिळू लागले आहेत. यात कोथिंबीर पिकाने जादा भाव खाल्ला आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीरीच्या जुडीला तब्बल 40 ते 45 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोथिंबीर खरेदी करत आहेत.
वाणेवाडी, मुरुम आणि मळशी या तीन गावातील शेतकऱ्यांनी एकूण 27 एकर कोथिंबिरीतून तब्बल 50 लाख रुपये कमावले आहेत. हा आकडा सर्वांसाठी चक्रावणारा आहे. गेल्या पाच वर्षातील कोथिंबिरीचा हा उच्चांकी दर असल्याचे व्यापारी आणि शेतकारी सांगत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून तरकारी पिकाला दर नव्हते, मात्र आता कोथिंबिरीच्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे.