पिंपरी चिंचवड : मुलगा जन्मला असं सांगितल्यानंतर हातात मुलगी आणून दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. डॉ डी वाय पाटील रुग्णालयात असा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जन्म दाखल्यावर तशी नोंद केल्याचा पुरावा नातेवाईकांकडून देण्यात आलाय. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे मुलगी नोंद असल्याचं म्हटलंय. जन्म दाखल्यावर तशी नोंद असेल तर त्या नर्स सुट्टीवर असल्याने त्यावर उद्या स्पष्टीकरण देऊ अशी रुग्णालयाने पळवाट शोधलेली आहे.


डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात 11 ऑगस्टच्या रात्री रिटा जगधने यांची प्रसुती झाली. तेव्हा त्यांची आई हिराबाई नवपुते आणि पती अनिल जगधने दोघे रुग्णालयात उपस्थित होते. पण बाळाला पहायला एकाच व्यक्तीला परवानगी देण्यात आली. तेव्हा पती अनिल यांनी सासू हिराबाई यांना प्रसूतिगृहात पाठवले. त्या आत गेल्यानंतर उपस्थित स्टाफने मुलगा झाल्याचं सांगितलं, पण बाळाला तब्येत चिंताग्रस्त असल्याने, त्याला आत्ताच बाहेर काढता येणार नाही. काही दिवस काचेत ठेवावे लागेल असं सासूकडे सांगितलं.

मग कागदावर अंगठा देऊन त्या बाहेर परतल्या. सासू हिराबाईंनी बाहेर येताच बाळाच्या वडील अनिल जगधने यांना मुलगा झाल्याची बाब सांगितली. काही वेळाने पत्नी रिटा यांना प्रसूतिगृहात बाहेर आणताच एकमेकांना पेढे भरवण्यात आले. दुसऱ्या दिवशी महापालिकेकडे करण्यात येणाऱ्या जन्म नोंदणीच्या दाखल्यावर ही मुलगा अशी नोंद करण्यात आली. पुढील चार दिवस नर्स आईकडून दूध घायच्या आणि काचेत ठेवलेल्या बाळाला पाजत असत.

15 ऑगस्ट दिवशी बाळाच्या तब्येतील चांगली सुधारणा झाल्याने त्याला आईकडे सुपूर्त करण्यात आलं. बाळ हातात आल्याच्या आनंदात हे कुटुंबीय होतं. पण थोड्यावेळाने बाळाने शी केलीये का? याची चाचपणी केली असता बाळ मुलगी असल्याचं कुटुंबियांना समजलं. मग हिराबाईंनी तातडीने रुग्णालयाला याचा जाब विचारला. तेव्हा रुग्णालयाने त्यांना खोटं ठरवायला सुरुवात केली. रुग्णालयातील प्रत्येक कागदावर मुलगी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

जन्म दाखला नोंदणीच्या अर्जावर मात्र रुग्णालयाने उडवाउडवीची उत्तरं दिली, असे आरोप नातेवाईकांनी केले आहेत. मग जगधने कुटुंबीयांनी माध्यमांकडे धाव घेतली. त्यानंतर माध्यमांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता जे एस भावलकर यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पिंपरी पोलिसांनी रुग्णालयात येऊन याप्रकरणी सर्व तपासणी केल्याचं आणि त्यात काही तथ्य आढळलं नसल्याचं सांगितलं.

तसेच अधिक माहितीसाठी प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ हेमंत देशपांडे यांच्याशी संपर्क साधायला सांगितलं. मग सुरुवातील पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी रुग्णालयात या चौकशीसाठी नव्हे तर दुसऱ्या कामासाठी गेल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे रुग्णालय याबाबत काहीतरी लपवत असल्याचं स्पष्ट झालं. मग डॉ देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णालयाच्या कागदांवर मुलीची नोंद असल्याचं सांगत जगधने कुटुंबियांचे आरोप फेटाळले आहेत.

पण जन्म नोंदणी दाखल्यावरील नोंदीबाबत त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. म्हणून त्यांनी त्या नर्स रविवारी सुट्टी असतात असं कारण पुढं करून पळवाट शोधली. जगधने कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि रुग्णालयाकडून दिलं जाणारं स्पष्टीकरण पाहता, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.