पुणे : कुठलंही झाड हा माणूस भ्रष्टाचारी आहे असं म्हणत नाही. मात्र आज खाऊन मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. उपाशीपोटी मरणाऱ्यांची संख्या कमी आहे. खाऊन जास्त आजार होतात. भ्रष्टाचाऱ्यांना अर्थात खाणाऱ्यांना खाऊ द्या आणि लवकर मरु द्या, असं प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत घरांसाठी लोकांनी झाडं तोडली मात्र आता घर पाडून झाडं लावायची वेळ आलीय. झाडं लावणं हा थॅंक्सलेस जॉब असून इथं प्रसिद्धी मिळत नाही. माणूस खोटा आणि घातक असल्यानं वाट लागली आहे असा आरोप सयाजी शिंदे यांनी केला आहे. पुण्यात आज अभिनेते सयाजी शिंदे लिखित तुंबारा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पाडला. एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ख्यातनाम चित्रकार प्रभाकर कोलते उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटीचे सर्वेसर्वा विश्वनाथ कराड होते. या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.


कार्यक्रमानंतर सयाजी शिंदे म्हणाले की, जनजागृतीसाठी वृक्ष संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. बीड जिल्ह्यातील डोंगरावर 13 आणि 14 रोजी वृक्ष संमेलन होणार आहे. वडाचं झाड या संमेलनाचं हे अध्यक्ष असणार आहे. यावेळी वृक्ष सुंदरीचा किताब दिला जाणार आहे. याचबरोबर एका आजारी गरुडाला आकाशात आणि आजघराला जंगलात सोडणार आहोत. यासंदर्भात सह्याद्री देवराई नावाचे अॅप काढलं असून त्यावर पुढील संमेलनाच्या नियोजनाची माहिती दिली जात आहे. ते म्हणाले की, ह्या गोष्टी मला खऱ्या वाटतात म्हणून करायच्या आहेत. आपण हवेवर जगतो, मात्र आपण दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देतो. जगायला ऑक्सिजन लागतो आणि हा ऑक्सिजन झाडं देतो. जगण्याची स्टाईल ही ऑक्सिजन आणि झाडं यापेक्षा मोठी नाही. ते म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी वृक्षसम्मेलन करणार आहोत. हे सेलिब्रेशन म्हणून नाही, खरं काम करायचं असेल तरच या. या सम्मेलनात मार्गदर्शक झाडं आणि निसर्गावरच बोलणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.





यावेळी राजीव खांडेकर म्हणाले की, पर्यावरणाच्या क्षेत्रात सयाजी शिंदे यांचं काम मोठं आणि मूर्त स्वरूपाचं आहे. सयाजी शिंदे जे बोलतात तेच करतात. सयाजी शिंदे यांचं पुस्तक आपल्याला आतून विचार करायला लावतं. त्यांच्या लेखणीत अद्भुत, विलक्षण ताकत आहे. ती ताकत तुम्हाला त्यांच्यासोबत घेऊन जाते. त्यांना वाचत असताना त्यांच्या प्रवाहात ते आपल्याला खेचतात. आपल्यातल्या गोष्टींची जाणीव करून देणार हे पुस्तक आहे. माणसाने पर्यावरणाची केलेली वाताहत यात प्रभावीपणे मांडली आहे, असं खांडेकर म्हणाले.