पुणे: पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी धाड टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती आहे. पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाचा समावेश होता, अशी माहिती समोर आली. प्रांजल खेवलकर असे त्यांचे नाव आहे
प्रांजल खेलवलकरांची आलिशान सोनाटा लिमोझिन कारवरून चर्चेत
राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेलवलकर या पूर्वीही एका कारणासाठी चर्चेत आले होते. यात खेलवलकरांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार वादात सापडली होती. या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करत अनेक आरोप केले होते.
अंजली दमानिया यांनी खडसेंच्या जावयाच्या लिमोझिन कारचा मुद्दा उपस्थित करत खडसे यांचे जावई प्रांजल खेलवलकर यांची एमएच 19 एक्यू 7800 ही सोनाटा लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा केला होता. जळगाव आरटीओमध्ये या गाडीची नोंदणी झाली असून, सदर गाडीला पासिंग मिळाले आहे. मात्र, या आलिशान गाडीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. हलक्या वाहनांच्या (एलएमव्ही) श्रेणीत या कारची नोंदणी करण्यात आली होती. शिवाय, अॅम्बेसिडर लिमोझिन कारव्यतिरिक्त अन्य लिमोझिन कारना देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला होता.