पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचं काल (4 जुलै) समोर आलं होतं. मोहोळ यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आणखी आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.


मुरलीधर मोहोळ यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महापौराना ताप आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरवरुन माहिती दिली होती. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेन. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असंही मोहोळ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


महापौरांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर कुटुंबातील 17 जणांची कोरोना टेस्ट केली होती. यातील आठ जणांचा रिपोर्ट काही वेळापूर्वीच आला असून हे सर्व पॉझिटिव्ह आहेत. इतर रिपोर्ट अजून आले नाहीत. ज्या आठ जणांना कोरोनाची लागण झाली त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समोर आलं आहे.


पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ 'कोरोना' पॉझिटिव्ह; काल उपमुख्यमंत्र्यासह अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थिती


महापौर मुरलीधर मोहोळ हे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉलमध्ये बोलावण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला अजॉय मेहता यांच्यासह राज्याच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हजर होते. त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधी देखील उपस्थितीत होते.


पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन


पुण्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचं काल निधन झालं. दहा दिवस ते कोरोनाशी मुकाबला करत होते, मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. काही दिवसांपूर्वी भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.