पुणे : शहराचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान महापौर हे काल (4 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉलमधे बोलावण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला अन्य महत्वाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.



पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या विळख्यात आता लोकप्रतिनिधी सापडताना दिसत आहे. यापूर्वीच भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर पिंपरी चिंडवडचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आज कोरोनाने उपाचार सुरू असताना मृत्यू झाला. अशातच आता पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्यांच्यावर शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महापौराना ताप आल्यानंतर त्यांची टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आली. याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.


पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन


“थोडासा ताप आल्याने मी करोनाची चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मात्र, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.”, असे ट्विट महापौर यांनी केलं आहे.



पुण्यातील त्या बैठकीला उपमुख्यमंत्र्यासह महत्वाचे अधिकारी उपस्थित
महापौर मुरलीधर मोहोळ हे काल (4 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉलमध्ये बोलावण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला अजॉय मेहता यांच्यासह राज्याच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हजर होते. त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधी देखील उपस्थितीत होते. बैठकीनंतर महापौरांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला होता.