पुणे : महागाईचा फटका आता हळूहळू सर्वसामान्यांच्या वडापावलाही बसू लागलाय. तेल, डाळ, गॅस अशा सगळ्याच गोष्टींचे दर वाढल्यामुळे वडापाव  देखील महाग झालाय. वडापाव कुठे 15 रुपयांना विकला जातोय तर कुठे 20 ते 25 रुपयांना विकला जातोय. वडापावच्या या वाढलेल्या किंमतीचा परिणाम ज्यांच्यासाठी तो जेवणाला पर्याय ठरतो अशा सर्वसामान्यांवर होतोय.

  


प्रत्येक चौकात मिळणारा वडापाव गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची ओळख बनलाय. चटकदार चवीबरोबरच सगळ्यांना परवडेल अशा किमतीत तो मिळत असल्यानं त्याला गरीबांचं अन्नही म्हटलं जातं. पण गेल्या काही दिवसांमध्ये खाद्य तेल, डाळी, गॅस यांच्या किमती वाढल्याने वडापावच्या किंमतीतही वाढ करण्यात आलीय. 


पुण्यात किडके बटाटे वापरणाऱ्या वडापाव विक्रेत्यांवर कारवाई


रात्री उशिरापार्यंत रिहर्सल करणारे उदयोन्मुख कलाकार असोत, सतत फिरतीवर असलेले रिक्षाचालक असोत किंवा घरापासून दूर राहणारे  विद्यार्थी. सर्वांसाठीच वडापावचा मोठा आधार असतो. मात्र काही दिवसांपूर्वीपर्यंत जो वडापाव 10 किंवा 12 रुपयांना मिळायचा तोच वडापाव आता 15 ते 20 रुपयांना विकला जातोय. जे फक्त चटपटीत चवीसाठी वडापाव खातात त्यांच्यावर कदाचित वडापावच्या या वाढलेल्या किमतींचा फारसा परिणाम होत नसेल. मात्र जे भूक भागवण्यासाठी वडापावच्या गाड्याकडे वळतात त्यांना मात्र याचा फटका बसतोय. 


वडापावच्या या वाढलेल्या किमतीचा परिणाम वडापावची विक्री करणाऱ्यांवरही झालाय. वडापावच्या विक्रीत 30 ते 40 टक्क्यांनी घट झाल्याचं काही वडापाव विक्रेत्यांचं म्हणणंय. जे आधी एकावेळेस दोन दोन-तीन तीन वडापाव खायचे ते आता खाताना  विचार करतायत.  


मोदक-वडापाव भारतीय पोस्ट खात्याच्या तिकिटांवर


गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलबरोबरच रोजच्या वापरातील वस्तूंचे दर झपाट्याने वाढलेत. खाद्यतेल तर दीडपट ते दुप्पट महाग झालंय. या सगळ्याचा परिणाम सगळ्याच वस्तूंचे आणि पदार्थांचे दर वाढले आहेत.  वडापाव तर महाराष्ट्रात सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ असल्यामुळे त्याच्यावर या माहागाईचा होणारा परिणाम सर्वाधिक लोकांच्या खिशावर होतोय.