पुणे : बटाटावडा खाणाऱ्या प्रत्येक पुणेकरासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पुणेकर जो बटाटावडा खात आहेत, त्यामध्ये किडलेले बटाटे वापरले जात असल्याची माहिती उघड झाली आहे. निकृष्ट दर्जाचे बटाटे वापरणाऱ्या पुण्यातील काही प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवरही अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागानं केलेल्या तपासणीत निकृष्ट दर्जाचा पाव तसेच वड्यांमध्ये किडक्या बटाट्यांचा वापर होत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे गार्डन वडापाव सेंटरवर वडापाव विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय अख्तर समोसा, बागवान हॉटेलवरही अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्यांच्या वापरामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे. शहरात विनापरवाना, नोंदणीशिवाय हॉटेल, कॅटरर्स आणि वडापाव विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 अंतर्गत तरतुदी बंधनकारक आहेत. या कायद्यात सांगितलेल्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते.