पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि गणेश मूर्तींचे विसर्जन नक्की कसं करायचं याबद्दल निर्माण झालेला संभ्रम यामुळे यावर्षी गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात विकल्याच गेल्या नाही. गणेशोत्सवाला सुरुवात होऊन काही दिवस उलटले असताना कुंभारवाड्यातील गणेश मूर्तींच्या कारखान्यात हजारो मूर्ती विकल्या न गेल्यानं तशाच पडून असल्याचं दिसून येत आहे.


पुण्यातील केशव नगरमधील कुंभारवाड्यात पन्नास ते साठ गणेश मूर्ती बनवणारे कारखाने आहेत. या कारखान्यांमधून बनवलेल्या गणेश मूर्ती पुण्याबरोबरच इतर शहरांमध्येही पाठवल्या जातात. पण इथल्या मूर्तीकारांच्या संघटनेचे अध्यक्ष असलेल्या प्रवीण बावधनकर यांच्या मते या वर्षी 50 टक्के मूर्तींची विक्रीच होऊ शकलेली नाही. इथल्या प्रत्येक कारखान्यांमध्ये दोनशे ते पाचशे मूर्ती विकल्या न गेल्यामुळे शिल्लक राहिल्यात. शिल्लक राहिलेल्या मूर्तींमध्ये लहान आणि मोठ्या अशा सर्व आकारांच्या मूर्तींचा समावेश आहे. त्याचबरोबर ज्या मूर्ती मुर्तीकारांकडून व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यात पण पुढं त्यांची विक्री होऊ शकलेली नाही, अशा मूर्तींचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना उधारीवर मूर्ती विक्रीसाठी देणाऱ्या मूर्तीकारांचे पैसे अडकलेत.



कोरोनामुळे मूर्तीकारांना फटका
यावर्षी कोरोनामुळे अनेकांना घरात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे शक्य झालेले नाही. तर अनेक गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवलीय. त्यामुळे गणपतीच्या मूर्तींची दरवर्षी इतकी विक्री झालेली नाही. त्याचबरोबर पुण्यात गणेश मूर्तींचे विसर्जन नक्की कसं करायचं यावरूनही संभ्रम निर्माण झाला होता. गणेश मूर्तींचे विसर्जन घरात करायचं की त्यासाठी महापालिका विसर्जन हौदांची सोय उपलब्ध करून देणार याबद्दल स्पष्टता नव्हती. त्यानंतर विसर्जनासाठी फिरते हौद उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आलं. मात्र, त्यामध्ये देखील वाद झाला. या सगळ्याचा परिणाम हा मूर्तींच्या विक्रीवर झाल्याचं मूर्तिकारांच म्हणण आहे.



पुढील वर्षीपर्यंत मूर्ती सांभाळण्याचं आव्हान
विकल्या न गेलेल्या या मूर्ती आता मूर्तीकारांना पुढील वर्षीच्या गणेशोत्सवा पर्यंत सांभाळून ठेवाव्या लागणार आहेत. परंतु, वर्षभर या मूर्तींना सांभाळणं सोपं नसल्याचं मूर्तिकार प्रशांत शिर्के यांचे म्हणण आहे. या मूर्तींना थोडा जरी वारा लागला किंवा पाण्याच्या संपर्कात आल्या तरी त्या खराब होतात. पुढील वर्षी त्यांची विक्री करण्यासाठी त्यांना पुन्हा रंग देणं आवश्यक बनतं. त्यामुळे संपूर्ण वर्षभर या मूर्तींना सांभाळून ठेवणं ही मोठी जोखीम असते. केशव नगर मधील या कुंभारवाड्यातील मूर्तीकार गोपी कुंभार यांच्या मते मूर्ती बनवण्याचा हा सगळा व्यवसाय कुंभार समाजातील लोक हे कर्ज काढून करत असतात. दरवर्षी गणेशोत्सवानंतर एका महिन्यांनी पुढील वर्षीच्या उत्सवासाठी गणपती मूर्ती बनवन्याला सुरुवात होते. त्यासाठी आवश्यक असलेला खर्च कुंभार कर्ज काढून करतात आणि गणपतींची विक्री झाली की ते कर्ज फेडलं जातं. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विकल्या गेलेल्या नाहीत आणि ज्या विकल्या गेल्या आहेत त्या सर्व मूर्तींचे पैसेही कुंभारांना मिळालेले नाहीत. त्यामुळे सरकारने आमच्या समस्येचा विचार करावा, अशी अपेक्षा गोपी कुंभार यांनी व्यक्त केली आहे.



कोरोनामुळं आपल्या देशातील उद्योगधंद्यांची अवस्था अतिशय नाजूक बनल्याचं आपण पाहतो आहोत. आता त्यामध्ये गणेशमूर्ती बनवणाऱ्या या मूर्तीकारांचीही भर पडण्याची शक्यता आहे. हजारो रुपयांच्या या मूर्ती पुढील वर्षीपर्यंत व्यवस्थित राहाव्यात म्हणून त्यांना प्लॅस्टिकच्या आवरणात गुंडाळून ठेवण्याची धडपड कुंभारांकडून सुरुय. त्याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरीसवर बंदी घालण्याची मागणी करणारी एक याचिकाही सर्वोच्च नायायालयात प्रलंबित आहे. त्या याचिकेचा निकाल प्लास्टर ऑफ पॅरीसवर बंदी घालण्याच्या बाजूने गेला. तर या मूर्तीचं काय करायचं असा या मूर्तीकारांसमोर प्रश्न आहे.

Bappa Majha 2020 | बाप्पा माझा घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे विजेते | ABP Majha