पुणे : दारु पिऊन घरात येऊ न देणाऱ्या सासूची जावयाने डोक्यात लोखंडी वार करत हत्या केली. पुण्यातील पाषाणमधील संजय गांधी वसाहतीत आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. चतुःश्रुंगी पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.


संजय गांधी वसाहतीतील लमाण तांडा परिसरातल्या वाघमारे वस्तीत 60 वर्षीय सुदामती गायकवाड आणि 45 वर्षीय आरोपी दिगंबर ओव्हाळ राहात होते. दिगंबर ओव्हाळ हा मजुरीचं काम करतो. दिगंबरचं यापूर्वी एक लग्न झालेलं आहे, तर सुदामती गायकवाड यांच्या मुलीसोबत त्याने दुसरं लग्न केलं आहे.

सुदामती गायकवाड या वारकरी होत्या, तर दिगंबरला दारुचं व्यसन होतं. त्यामुळे तो जेव्हा दारु पिऊन यायचा, तेव्हा सुदामती त्याला घरात येऊ देत नसत. या कारणावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणंही व्हायची. आज दुपारीही त्यांच्यात जुन्या कारणावरुन वाद झाले. त्यानंतर सुदामने लोखंडी रॉडने सासू सुदामती गायकवाड यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच चतुश्रुंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी दिगंबरला ताब्यात घेतले असून सुदामती यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली.