पुणे: पुण्यातील खड्डे हे पुणेकरांसाठी तर त्रासदायक ठरत आहेतच, आता या खड्ड्यांचा फटका देशाच्या राष्ट्रपतींना देखील बसला आहे. २ आणि ३ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पुणे दौऱ्यावर होत्या. पुण्यातील राजभवनला त्यांचा मुक्काम होता. तिथून कार्यक्रमांसाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जातांना राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील खड्ड्यांचा मोठा त्रास झाला. राष्ट्रपती कार्यालयाने ही नाराजी पुणे पोलीसांना कळवली. त्यामुळे आता २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यात येणार असल्यानं रस्त्यांवरील हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत यासाठी पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय. राष्ट्रपती कार्यालयाने व्यक्त केलेली नाराजी पाहता पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास महापालिकेला सांगण्यात आलं आहे.


पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. या कामांमुळे खड्डे पडत असल्याचा महापालिकेचा दावा आहे. त्यामुळे हे खड्डे महापालिकेने बुजवायचे की महापालिकेने यावरून दोन यंत्रणांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार याआधी झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी खड्डे कोण बुजवणार हे पहावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  २६ सप्टेंबरला पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी पुण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एस पी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या दौऱ्यामध्ये 26 सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रोचे भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते शिक्षक प्रसारक मंडळी संस्थेचे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर  सहभागी होतील.त्यानंतर ते पुणे मुक्कामी राहणार आहेत. त्यासाठीची सर्व व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.


दुसऱ्या दिवशी मोदी (PM Narendra Modi) विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विकसित भारत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. बारा ते अडीच दरम्यानचा वेळ हा आरक्षित ठेवण्यात आला आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करू शकतात अशी शक्यता आहे. 


27 सप्टेंबरला सायंकाळच्या  सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तुकाराम जगन्नाथ कॉलेज खडकी येथील विकसित भारतच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील आणि त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.