पुणे : भारत आणि पाकिस्तानमध्ये संवाद सुरु असल्यास सीमावर्ती भागात शांतता असते. बळींच्या संख्येत घट होऊन शांतीचं वातावरण असतं.  त्यामुळे जम्मू आणि काश्मिरची समस्या ही संवादातून सुटेल, असा विश्वास माजी सनदी अधिकारी डॉ. फैजल शाह यांना वाटतो. फेसबुकसारख्या सोशल मीडियात काही लेखन केल्यास तुरुंगात टाकलं जातं. एखाद्याने फेसबुकवर काही लिहिल्यावर धोक्यात येण्याइतकी आपली लोकशाही असुरक्षित आहे का, सरकारविरोधात बोलणं देशविरोधी आहे का, असा सवालही शाह यांनी उपस्थित केला.


काश्मिरच्या बळींवर देशात मताचं राजकारण होत असल्याने देशाचं नुकसान होतं. निवडणुका जवळ आल्यामुळे दोन्ही देशात संवाद होत नसल्याचं नागरिकांना वाटतं. काश्मिरला आग लागल्यावर अनेकांच्या हातात तेल असतं. मात्र ही आग विझवण्यासाठी कोणाकडे पाणी आहे, हे मी शोधत असल्याचं शाह यांनी म्हटलं. पुण्यात ते श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापात बोलत होते. आयएएस परीक्षेत देशातील टॉपर राहिलेल्या शाहांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला.

जम्मू आणि काश्मीरची राजकीय कोंडी झाली आहे. हिंसाचारात तरुण, पोलिस आणि जवानांसह अनेकांचा मृत्यू होतो. दोन्ही बाजूने बळी पडत आहेत. त्यामुळे चर्चा आणि संवादातून हा प्रश्न सुटणार आहे. ही प्रशासकीय नाही, तर राजकीय समस्या असल्याने मी नोकरी सोडल्याचं शाहांनी सांगितलंय.

जम्मू आणि काश्मिर राज्याची सर्वात भ्रष्टाचारी म्हणून ओळख आहे. इथल्या राजकारणात तरुणांचा समावेश नसून ते मतदानही करत नाही. त्यामुळे राजकारणात तरुणांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न आहे. जम्मू काश्मिरच्या समस्येवरही लोकशाही मार्गाने चर्चेतून तोडावा काढावा लागणार असल्याचं शाह यांनी सांगितलं.

सनदी सेवेतील नोकरीचा राजीनामा दिल्यावर अनेक राजकीय पर्याय खुले होते. मात्र मला कोणत्याही राजकीय पक्षात जायचं नाही, तर नवीन राजकीय पक्ष काढण्याचा विचार करत आहे. आगामी निवडणूक हे माझं उद्दिष्ट नसून पुढील काळावर मी लक्ष केंद्रित केल्याचं शाह यांनी म्हटलं. मला नवीन राजकीय पक्षात तीन विभागातील नागरिकांना एकञ आणायचंय. नवीन पक्ष काढून नागरिकांची विभागणी करायचं नसल्याचं शाह यांनी म्हटलं.

काश्मिरला मुस्लिमांसह काश्मिर पंडितांचाही सहभाग आवश्यक आहे. दोघांशिवाय पुढील पिढीला संस्कृती समजणार नसल्याचं शाह यांनी म्हटलं. येणार्‍या पिढीला जम्मू आणि काश्मिरची विविधता समजणं अवश्यक आसल्याचं शाह यांनी सांगितलं.

जम्मू काश्मिरच्या नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. सर्वप्रथम हिंसाचाराला आळा घालण्याची गरज आहे. नागरिकांचा घटनेवर, लोकशाहीवर विश्वास निर्माण करायचा आहे. मात्र मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केलं गेलं. फेसबुक सारख्या सोशल मीडियात काही लिखाण केल्यास तुरुंगात टाकलं जातं. एखाद्याने फेसबुकवर काही लिहिल्यामुळे धोक्यात येण्याइतकी आपली लोकशाही असुरक्षित आहे का, असा सवालही शाहांनी उपस्थित केला.