पुणे : शहरातील कल्याणी नगर पोर्शे कार अपघातात डॉ.अजय तावरेने वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार केला आहे. अल्पवयीन मुलाचा ब्लड सॅम्पल आणि अहवलात फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी अजय तावरेसह तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलिस कोठडी (Police) सुनावली आहे. त्यामुळे, पोलिसांकडून आरोपी अजय तावरेसह इतर दोघांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या तपासात दररोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. त्यातच, डॉक्टर तावरे याने सिनेस्टाईल प्लॅन रचून ब्लड सॅम्पलची अदलाबदली केल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे, पुणे (Pune accident) अपघातानंतर डॉक्टरी पेशाला काळीमा फासण्याचं कामही या डॉक्टराकडून झाल्याचं दिसून येत आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर 19 मे रोजी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते. त्यामुळे त्या रक्तचाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी बदलले. मात्र, हे ब्लड सॅम्पल कुणाचे हा प्रश्न अनुत्तरीत होता. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने काल अहवाल सादर केला. त्यात मुलाचे रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचं नमूद केल्याचं समजतं. मात्र, आता पोलीस तपासातून आणखी वेगळीच माहिती समोर येत आहे. अजय तावरेने अगदी सिनेस्टाईल प्लॅन आखल्याचं दिसून येत आहे.
मिळते-जुळते तीन व्यक्तींचे नमुने
पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला अणि त्याच्यासोबतच्या त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचवण्यासाठी या तिघांचे ब्लड ग्रुप ज्यांच्याशी जुळतात अशा तीन व्यक्तींचे रक्ताचे नमुने घ्यायचं ठरलं होतं. डॉक्टर अजय तावरेने या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी तसा प्लॅनच आखला होता. त्यानंतर त्या तीन अल्पवयीन मुलांचे पालक त्यांच्या मुलांच्या ब्लड ग्रुपशी ज्यांचे रक्तगट जुळतात अशा तीन व्यक्तींना घेऊन ससुन रुग्णालयात पोहचले होते. त्यामुळे, आता पोलिस त्या तीन व्यक्ती कोण याचा शोध घेत आहेत. अजय तावरेच्या सांगण्यावरुन ब्लड ग्रुपशी मिळते जुळते सॅम्पल देण्यासाठी रुग्णालयात आलेले ते तिघे कोण होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वडगाव शेरीतून आले होते दोघे
पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हलनुर यांना पैसे द्यायच ठरलं. त्यासाठी दोन व्यक्ती पुण्यातील वडगाव शेरी भागातून निघून ससूनच्या 40 नंबर वॉर्ड मध्ये पोहचल्या होत्या. या दोन व्यक्तींनी अतुल घटकांबळे याच्याशी संपर्क केला होता. त्यामुळे, आता या दोन व्यक्ती कोण? त्या कोणाच्या सांगण्यावरून ससून रुग्णालयात आल्या होत्,या याचा पोलिस तपास करत आहेत. म्हणजेच, रुग्णालयात आलेल्या दोन व्यक्ती आणि ब्लड सॅम्पल देण्यासाठी आलेल्या तीन अशा एकूण पाच व्यक्तींचा तपास पोलिसांकडून होत आहे.
डॉक्टरला 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी
डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता, 5 जूनपर्यंत पोलीस (Police) कोठडी देण्यात आली आहे. अपघात व ब्लड फेरफार प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयातील (Sasoon) डॉक्टर आणि शिपायास 27 जूनला अटक केली होती. त्यानंतर, न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आता, त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात जबरदस्त युक्तिवाद केल्याचंही दिसून आलं.