Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory : इंदापूर (Indapur) तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory) फिल्डमनला त्याच कारखान्याच्या संचालकाने ऊसाला तोड का देत नाही? या कारणातून शिवीगाळ करत ऊसाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेश विरचंद भोईटे असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो छत्रपती सहकारी साखर कारखान्यात फील्डमन म्हणून काम करतो. सुरेश भोईटे यांच्या तक्रारीवरून आता वालचंद नगर पोलीस ठाण्यात कारखान्याचे संचालक सर्जेराव शिवाजी जामदार यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळाला पाहिजे अशी मागणी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना चालवला जातो. राज्यात ऊस गाळपाचा हंगाम चालू आहे. शेतकऱ्यांच्या उसाला वेळेवर तोड मिळत नाहीत म्हणून शेतकरी देखील मेटाकुटीला आले आहेत. अशा वेळी कारखान्याचे संचालकच नियम धाब्यावर बसून ऊसाला तोड मागत असतील आणि थेट कर्मचाऱ्यांनाच मारहाण करत असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जाब विचारायचा कोणाला ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळं या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तर या सर्व घडामोडीनंतर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळाला पाहिजे अशी मागणी विशाल मधुसुदन निंबाळकर यांनी कारखाना प्रशासनासह राज्याच्या साखर आयुक्तांकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ देखील नुकताच व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ते अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. या अगोदरही बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असतानाच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
महत्वाच्या बातम्या: