मुंबई : नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने (Baramati Namo Rojgar Melava) बारामतीमध्ये येणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  यांना शरद पवारांनी (Sharad Pawar) निमंत्रण दिलं होतं, पण व्यस्ततेच्या कारणामुळे आपल्याला हे शक्य होणार नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) हे निमंत्रण नाकारलं आहे. त्या संबंधित त्यांनी एक पत्रही शरद पवारांना लिहंलं असून त्यांचे आभारही मानले आहेत. सोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही नियोजित कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळे निमंत्रण नाकारल्याची माहिती आहे. 


शनिवारी, 2 मार्च रोजी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. बारामतीमध्ये शरद पवारांचे निवासस्थान असल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. पण  व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण या जेवणासाठी हजर राहू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी नम्रपणे सांगितलं आहे. 




काय म्हणाले देवेंद्र फडणवीस


आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.


आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही.


निमंत्रण पत्रिकेच्या वादानंतर प्रशासनाची सारवासारव


बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शनिवारी आणि रविवारी नमो रोजगार मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या शनिवारी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं, यानंतर सरकारवर टीका करण्यात येत होती. शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असून ते राज्यसभेचं प्रतिनिधीत्व करतात, या कार्यक्रमाला राज्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही, असा अर्थ होतो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. यानंतर आता सरकारने सारवासारव करत नवीन निमंत्रण पत्रिका काढली असून त्यामध्ये शरद पवाराचं नाव नमूद करण्यात आलं आहे.


 


ही बातमी वाचा: