मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha) काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar on Pune Loksabha) यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी रवींद्र धंगेकर यांनी आपला पत्ता खोलला आहे. गेल्या काही दिवसांपासून रविंद धंगेकर यांचे उमेदवारीसाठी चर्चेत असतानाच त्यांनी जाहीरपणे उमेदवारी मागितली असल्याचे सांगितले.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले असता रविंद्र धंगेकर यांनी भूमिका स्पष्ट केली. धंगेकर यांनी सांगितले की, माझ्या पक्षाकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने विश्वास ठेवल्यास मी तो नक्की सार्थ ठरवेन. ते पुढे म्हणाले की सातत्याने नऊ वेळा मी निवडणूक लढलो असून लोकांनी विश्वास ठेवला आहे. दरम्यान, त्यांनी पक्षाने अजूनही कोणत्याही प्रकारची तयारी करायला सांगितले नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, माझा डीएनए छत्रपतींचा आहे. छत्रपतींनी सर्व समावेश स्वराज्य उभा केलं. त्यांच्याच भागात मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असल्याचे रवींद्र धंगेकर म्हणाले. 


धंगेकर यांनी ड्रग्ज प्रकरणावरून तोफ डागली. अनेक खेड्यात अंमली पदार्थ विकले जात असल्याचे ते म्हणाले. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात संजीव ठाकूर यांना अटक झालेली नाही. आमच्या तरुणाईला बिघडवण्याची काम शासन स्तरावरून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यातील पब संस्कृतीला विरोध असल्याचे ते म्हणाले. नाशिक, छत्रपती संभाजी नगर, दौंड या भागामध्ये प्रचंड प्रमाणात ड्रग सापडत असताना पोलीस प्रशासन काय करत आहे? अशी विचारणा त्यांनी केली.  टेकडीवर नशेत सापडलेल्या आमच्या मुली होत्या, तर मग आम्ही बघत बसायचे का? अशी विचारणा त्यांनी केली. 


कोण आहेत रविंद्र धंगेकर?



  • काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर 2023 मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत विजयी

  • मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठेतील जागा रिक्त झाली होती. 

  • पुणे शहर लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय 

  • 2014 मध्ये काँग्रेसचे विश्वजीत कदम विरुद्ध भाजपचे अनिल शिरोळे लढत झाली. त्यावेळी भाजपच्या अनिल शिरोळे यांनी  विश्वजीत कदम यांना 3 लाख 15 हजार मतांनी पराभूत केले होते. 

  • 2019 मध्ये भाजपकडून अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता भाजप महायुतीकडून गिरीश बापट यांना उमेदवारी दिल्यानं निवडणुकीत काय होईल याची उत्सुकता होती. भाजपचा उमेदवार ठरून अनेक दिवस होऊनही काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला नव्हता. त्यामुळे शेवटी काँग्रेसला निवडणूक अवघड झाली. गिरीश बापट यांनी 2019 च्या या निवडणुकीत 3 लाख मतांनी बाजी मारली होती.