Ajit Pawar : कामासाठी आम्ही झपाटलेली माणसं आहोत. शेवटी जनतेचा, प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे, कोरोनामध्ये आपण हे पाहिलेय.  बऱ्याच दिवसांनी मुंबईत कोरोनामुळं रुग्ण दगावला. त्यामुळं कोरोना गेलेला नाही. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. अन्यथा विनाकारण नियम लादावे लागतील. मग नाराजी व्यक्त करू नका. बघा आता सोनिया गांधी, राज ठाकरे यांनाही कोरोना झालाय. मी वेगळ्या अर्थाने सांगत नाही. हसण्यावारी घेऊ नका. गांभीर्याने घ्या. भाषण करताना माझा चेहरा तुम्ही खूप दिवसांनी पाहिला असेल. मी आणि मुख्यमंत्री मास्क काढतच नाही. कारण कोरोना अजून गेलेला नाही. कोरोनाचे नियम पाळा, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात राष्ट्रवादीच्या कार्यकारणी पदांचे वाटप केले गेले. त्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी कोरोना अद्याप संपला नसल्याचं सांगितले.  त्याशिवाय पिंपरी चिंचवडमधील अनेक प्रश्नावर प्रकाश टाकला. 


बूस्टर डोसबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांचे टोचले कान 
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेत. आता बूस्टर डोसही घ्या. मी आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही घेतलाय. माजी महापौर योगेश बहलांनी मला विचारलं, बूस्टर डोस घेतला की खूप त्रास होतो. आता मला भीती दाखवत होता की शंका उवस्थित करत होता, हेच मला कळेना. आता मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन डोस घेतला. मी म्हटलं अरे योगेश डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यायची असते. उगाच काहीही गैरसमज पसरवायचे नसतात. (एकच हशा पिकला) आता मी डोस घेऊन चोवीस तास ही उलटले नाहीत अन् हा मला असं सांगतोय. आता काहींना त्रास होत असेल पण डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस घ्यायलाच हवा, असे अजित पवार यांनी सांगितले. 


शरद पवारांवर टिका करणाऱ्यांचे टोचले कान 
अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला असं करतात. शरद पवार साहेबांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यावर काहीही उठसुठ आरोप करतात. देशातील मोठे नेते पवार साहेबांचं नाव सन्मानाने घेतात. अशा व्यक्तीवर नको ते आरोप करतात. अशांकडे लक्ष देऊ नका, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 


मंजूर पाणी रद्द झालं तर?
भामा आसखेड धरणाचे पाणी आम्ही मंजूर करून दिलंय. तरी पालिकेतील सत्ताधारी भाजपने ते शहरात आणलं नाही. पण का? आता मला सांगा ह्यांनी उशीर केलाय, उद्या सरकारने पाणी द्यायचा निर्णय रद्द केला तर? काय होईल. हे कोणामुळं होतंय? असे म्हणत अजित पवार यांनी भाजपवर ताशेरे ओढले.


जादूची कांडी फिरवणार नाही -  
गेल्या पाच वर्षात हे तुम्हाला रोज पाणी देऊ शकले नाहीत. का? अरे ज्यांच्या अंगात पाणी नाही, ते काय तुम्हाला पाणी देणार. तुम्हाला मी शब्द देतो, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या मी रोज तुम्हाला पाणी देणार. आता तुम्ही म्हणाल मी काय जादूची कांडी फिरवणार आहे का? तर नाही, शहराच्या वाट्याला जे पाणी आहे, तेच तुम्हाला देणार. यासाठी योग्य ते नियोजन करणार.


नसबंदीत घोटाळा - 
इथं नसबंदीत घोटाळा झाला. 1975 च्या नसबंदीची आठवण झाली. तेंव्हा इंदिरा गांधींना ही पराभव स्वीकारावा लागला. जनतेच्या मनात आल्यावर अनेकांना डोक्यावर घेते अन् सत्तेतून पायउतार ही करते. हा लोकशाहीचा इतिहास आहे. तेव्हा कोणतही काम करताना काळजी घ्यावीच लागते. जनता विकास काम करणाऱ्यांच्या मागे उभी का राहत नाही. केंद्रात, राज्यात, इथली अन पुण्याचीही महापालिका भाजपची आली. याची खंत आहे. 


नाराज होऊ नका - 
हे एकट्या अजित पवारांचे, एकट्या शहराध्यक्षांचे काम नाही. आम्ही जोमाने जोर लाऊच. पण पक्षाचा खरा कणा तुम्ही कार्यकर्ते आहात. पण हे काम करताना काही वाटप होत. अशावेळी प्रत्येकाचं समाधान होत नाही. अशावेळी कार्यकर्त्यांनी घरी बसून राहू नये, विरोधात काम करू नये. त्यांना भविष्यात पद मिळेल अशी ग्वाही देतो. कुणीही नाराज होऊ नका, असे अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. 


पिंपरी चिंचवडमधील सिसिटीव्हीवर काय म्हणाले?
7 हजार 600 सिसिटीव्ही कॅमेरे शहरात बसवणार आहे. मग सगळं कळणार. रात्री कोण कुठं फिरतंय, कोणासोबत फिरतंय, कसं फिरतंय. गार्डनमध्ये कोण गुलु गुलु करतंय, कोणाचा पाय कुठं - कसं घसरतोय हे सगळं कळणार. हा चेष्टेचा भाग सोडा पण कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करतोय, अशी हमी अजित पवार यांनी दिली. 


विकास कामांना नाव देण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार?
शहरातील विकास कामांना युगपुरुषांची नावं द्यायला हवीत. ज्यांची नावं पाहिली, ऐकली की प्रेरणा मिळायला हवी. याबाबत तुम्ही आम्ही विचार करायला हवा. मी तर राज्य सरकारच्या पातळीवर धोरण ठरवायचा विचार करतोय. कोणत्याही विकास कामाला नाव द्यायचं असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यायला हवी, असं धोरण ठरवावं लागणार आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.