पुणे : पुण्यात डेंग्यूचा फैलाव होण्यास प्रामुख्यानं सोसायट्याच जबाबदार असल्याची बाब एका पाहणीतून समोर आली आहे.  महापालिकेनं केलेल्या पाहणीत पुणे शहरातल्या तब्बल 2 हजार 849 सोसायट्यांमध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचं निष्पन्न झालंय.


वास्तविक, डेंग्यूचे डास हे अस्वच्छ पाण्याचे होतात, असा अनेकांचा समज असतो.  मात्र डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्यानं त्यात सोसायट्या आघाडीवर आहेत.

डेंग्यूचे डास अढळल्या प्रकरणी रुग्णालये, चालू बांधकामं, मॉल अशा एकूण 4 हजार 340 नोटीसा महापालिकेनं बजावल्या आहेत. ज्यात सोसायट्यांसह इतर संबधितांना यावर त्वरित पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसात पुण्यात डेंग्यूचे सुमारे सव्वाशे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून महापालिका क्षेत्रात सध्या डेंग्यूच्या डासांचे ब्रीडिंग स्पॉट शोधून, तिथल्या डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्याचं काम करण्यात येतंय. डेंग्यूच्या अळ्या सापडल्याबद्दल जवळजवळ 67 जागांवर महापालिकेनं कारवाई केली आहे.