पुण्यात अॅसिड फेकण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार
मिकी घई, एबीपी माझा | 10 Feb 2020 01:47 PM (IST)
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडत आहेत. मात्र पुण्यात अॅसिड फेकण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
पुणे : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. अॅसिड फेकण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन 25 वर्षीय तरुणावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. संबंधित मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. आरोपी दररोज तिच्या शाळेबाहेर थांबून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. मात्र ती प्रतिसाद देत नसल्याने तिचा पाठलाग करुन तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड फेकेन आणि घरच्यांनाही मारुन टाकेन, अशी धमकी आरोपी देत होता. ही घटना घडली त्या दिवशी आरोपीने मुलीला जबरदस्तीने बाईकवर बसवलं आणि वाघोली परिसरात नेलं. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. शिवाय अत्याचार करतानाचा व्हिडीओही तयार केला. याविषयी कोणाला काही सांगितल्यास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर त्याचा त्रास वाढतच राहिला. अखेर त्रास असह्य झाल्याने पीडितेने घरच्यांना हा प्रकार सांगितला. पीडितेच्या आईने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. त्याच्यावर विनयभंग, पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.