पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 132 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ (Dagadusheth) हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. त्यामुळे, यंदाच्या गणेशोत्सवात गणपती देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना व पर्यटकांना हिमाचल प्रदेशमधील प्रति शिवमंदिराच्या दर्शनाचा लाभ घेता येईल, असेच म्हणावे लागेल. 
 
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक अमन विधाते व दिपाली विधाते यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदाची प्रतिकृती असलेले हिमाचल प्रदेशच्या सोलन मधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे. जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटावरून पडले आहे.  हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. पुराणातील उल्लेखानुसार भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते, असे मानले जाते.
 
जटोली मंदिर विशिष्ट अशा दक्षिण-द्रविड वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे आणि ते सलग तीन पिरॅमिड ने बनलेले आहे. पहिल्या पिरॅमिडवर गणेशाची प्रतिमा तर दुस-या पिरॅमिडवर शेष नागाची प्रतिमा दिसते. हे मंदिर बांधण्यासाठी 39 वर्षे लागली. या मंदिराची उंची अंदाजे 111 फूट आहे. मंदिरातील दगडांवर थाप मारल्यावर डमरू सारखा आवाज देखील येतो.


125 फूट लांब अन् 11 फूट उंच


गणेशोत्सवात साकारण्यात येणा-या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 11 फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.