Pune Drugs News : पुण्यातील एफसी रोडवरील (FC Road) नामांकित हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची (Drugs) नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील लिक्वीड लिजर लाउंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल (Sandeep Gill) यांनी दिली आहे. 


पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येऊन ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून तरुण ड्रग्ज घेत असल्याचे दिसून आले आहे. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. 


काय म्हणाले पोलीस उपायुक्त संदीप गिल?


यावर पोलीस उपायुक्त संदीप गिल म्हणाले की, पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 8 जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.  या प्रकरणाची योग्य चौकशी होणार आहे. पार्टी करणाऱ्या ग्रुपने जेवण आणि दारूवर 80 ते 85 हजार खर्च केले आहेत. 40 ते 50 जणांची तपासणी होणार आहे. सीसीटीव्ही पाहून तपासणी केली जाणार आहे.  अनेकदा सूचना देऊनदेखील अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्यात दिरंगाई दाखवली म्हणून दोन अधिकारी आणि दोन अमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती संदीप गिल यांनी दिली आहे. 


अंधारे, धंगेकरांच्या आरोपांच्या फैरी 


पुणे ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका करत गंभीर आरोप केला आहे. राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहोचतात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो, असा मोठा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. तसेच पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर आम्ही तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडत आहोत. जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे सापडले होते. तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. शंभूराज देसाई यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. शंभूराज देसाई यांच्यासाठी काम करणारे उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचेही निलंबन झाले पाहिजे. हे झाल्याशिवाय पुणे सुधारणार नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 


शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर 


गेल्या महिन्याभरात आपण पुण्यातील 49 हॉटेल आणि बारवर कारवाई केली आहे. पुण्यात सरप्राईज चेकिंग सुरु करण्यात आले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार आहे. तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्याचीही चौकशी करणार आहोत. जो अधिकारी यात दोषी आढळेल, त्यावर कारवाई केली जाईल, असे शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले.


आणखी वाचा 


पुण्यात FC रोड ड्रग्जपार्टी प्रकरणी 5 जण ताब्यात ; अंधारेंनी नाव घेतलेले चरणसिंग राजपूत हॉटेलमध्ये दाखल