Daund Crime news :  पुणे जिल्ह्यातील दौंड राज्य राखीव पोलीस दलाच्या (Daund Crime news ) पोलिसांच्या गणवेशाच्या पुरवठ्यात पोलीस खात्यालाच चुना (Police) लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दौंड पोलिसांनी मुंबईतील भोईवाडा, परेल येथील राजेंद्र शिवरामपंत पालव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच नंबर युनिटचे दौंडचे पोलीस निरीक्षक सुरेश दगडू जाधव यांनी दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पालव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


14 मार्च 2017 ते 14 डिसेंबर 2022 या दरम्यान एसआरपीच्या दौंड येथील सन्मान गार्डसाठी आवश्यक गणवेश आणि त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याची परवानगी शासनाने दिल्यानंतर राज्य राखीव पोलिस दलाने पुरवठादारांकडून दरपत्रके मागवली. या दरपत्रकात प्रो प्रा. पालव अॅण्ड ब्रदर्स या पुरवठादारास त्याचे दर कमीत कमी असल्याने साहित्य आणि गणवेश पुरवठा करण्याचे टेंडर बहाल करण्यात आले. त्याच्या बिलाची रक्कम राज्य राखीव पोलीस दलाच्या पाचव्या युनिटच्या स्टेट बॅंकेतील खात्यातून धनादेशाद्वारे देण्यात आली होती. मात्र या व्यवहारात जास्त रक्कम पुरवठादाराकडे जमा झाली. 


दरम्यान, त्यानंतर राज्य राखीव पोलिस दलाच्या मुख्यालयाने ही जास्तीची रक्कम पोलीस दलाच्या दौंड येथील स्टेट बॅंकेच्या शाखेतील खात्यावर जमा करण्यासाठी पालव यांना सूचना देण्यात आली. या व्यापाऱ्याने एक धनादेश जमा केला. मात्र तो वठला नाही. त्यासंदर्भात या व्यापाऱ्यास कळवल्यानंतर त्याने काही रक्कम स्टेट बॅंकेत आरटीजीएस केली. मात्र उरलेली रक्कम देण्यास तो टाळाटाळ करु लागला. नोटीस देऊनही त्याने ही रक्कम जमा केली नाही. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्यावरुन दौंड पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली.


पोलिसांनाच लावला चुना


पालव यांना गणवेशाचं टेंडर देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पैसेही देण्यात आले होते. पैसे जास्त दिल्याने हा प्रकार घडला. पैसे परत करण्यात पालव टाळाटाळ करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अनेकदा सूचना देखील केल्या. मात्र पालव ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अनेकदा पैसे मागितले मात्र पालव यांनी पैसे पाठवले नाहीत. त्यामुळे पोलिसांनीच तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दौंड पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पालव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पालव यांच्या या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहे. त्यांच्यावर नेमकी पोलीस कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.