पुणे: उद्योगपती आणि सीरम इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर (Serum Institute of India) सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic Pune) डॉ. पुर्वेझ ग्रॅंट यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर ॲंजिओप्लास्टी (Angioplasty) झाल्याची माहिती आहे. सायरस पुनावाला यांची प्रकृत्ती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


सायरस पुनावाला यांना शुक्रवारी सकाळी रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आलं आहे. पुनावाला यांना गुरूवारी हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याची माहिती समोर आली आहे. 


प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालयाची माहिती


रूबी हॉल क्लिनिककडून या संबंधित एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, डॉ. सायरस पूनावाला यांना 16 नोव्हेंबर 2023 रोजी हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याने त्यांना रुबी हॉल  येथे दाखल करण्यात आले. शुक्रवारी पहाटे सायरस पुनावाला यांच्यावर डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. ते लवकर बरे होत आहेत आणि रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल. डॉ. पुनावाला यांची तब्येत सध्या चांगली आहे.


सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या (Forbes) 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला हे सहाव्या क्रमांकावर आहे. 1966 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे आहे. सीरम दरवर्षी गोवर, पोलिओ आणि फ्लूसह लसींचे 1.5 अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करते.


कोविड लस तयार करण्यात कंपनीची मोठी भूमिका 


सीरमचे सीईओ आणि सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने कोविड-19 लस तयार करण्यासाठी नवीन कारखाना तयार करण्यासाठी 800 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती. त्यांनी बनवलेली लस Covishield ही महामारीच्या काळात भारतात सर्वाधिक वापरली गेलेली लस आहे.


सायरस पूनावाला यांची मालमत्ता


या कंपनीशिवाय, पूनावाला यांच्या मालमत्तेत फायनान्स सर्व्हिसेस फंड पूनावाला फिनकॉर्पमधील बहुसंख्य भागभांडवल तसेच पुण्यातील रिट्झ-कार्लटन हॉटेलमधील भागभांडवल यांचाही समावेश आहे. फोर्ब्सच्या मते, सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती 20.9 अब्ज डॉलर आहे.