पुणे : अपघातात झालेल्या पायाच्या दुखापतीमुळे चार रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर, पुण्यातील एका व्यक्तीला कोरोनाचीच लागण झाल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा रुग्ण उपचारासाठी ज्या चार रुग्णालयात फिरला, त्यापैकीच एका रुग्णालयात त्याला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या रुग्णालयात लागण झाली, या रुग्णाच्या संपर्कात कोण कोण आलं आणि पायावरील उपचारादरम्यान कोरोनाची लागण कशी झाली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. हा गोंधळ कमी की काय, या रुग्णाच्या उपचारावरील खर्चाचाही मुद्दा उपस्थित होत आहे.


काय आहे प्रकरण?

18 मार्चची दुपारी साडेबाराची वेळ. पुणे -3, अहमदनगर रस्त्यावरील सणसवाडीमध्ये दुचाकीवरुन निघालेल्या तरुणाचा अपघात झाला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला जवळच्या शिक्रापूर गावातील एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टरांनी अपघात झालेल्या तरुणाला तपासलं असता उजव्या पायाचं हाड मोडल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पायाचं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी पेशंटला आणि त्याच्या घरच्यांना सांगितलं. त्यासाठी साधारणपणे किती खर्च येईल याचीही डॉक्टरांनी कल्पना दिली. पण त्या कुटुंबाला तो खर्च जास्त वाटला. त्यांनी शिक्रापूरमध्येच असलेल्या त्यांच्या ओळखीचे डॉक्टर जिथे काम करतात तिथं उपचारांसाठी जायचं ठरवलं.


रुग्णाला अॅम्ब्युलन्समधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणलं. उपचार सुरु झाले, पण त्याच रात्री बारा वाजता रुग्णाला श्वसनाचा त्रास जाणवायला लागला. पायाचं हाड तुटल्यावर काही वेळा रक्ताची गुठळी किंवा चरबी रुग्णाच्या फुफ्फुसात अडकते. वैद्यकीय भाषेत त्याला pulmonary Embolism म्हणतात . तसाच त्रास रुग्णाला होत असावा असं वाटून त्याकडे आधी दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र दुसऱ्या दिवशी या हॉस्पिटलने या रुग्णाला शिक्रापूरपासून जवळ असलेल्या वाघोली गावातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. 19 मार्चला या रुग्णाला वाघोलीतील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पुढचे चार दिवस वाघोलीतील त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार सुरु होते. पण इथेही श्वसनाचा त्रास काही कमी होत नव्हता. त्यामुळे डॉक्टरांना शंका येऊ लागली.


अखेर या रुग्णाला पुण्यातील नगर रस्त्यावर असलेल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करायचं ठरलं. 23 मार्चला हा रुग्ण नगररोडवरच्या या हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल झाला. सहा दिवसात या रुग्णाच्या वाट्याला आलेलं हे चौथं हॉस्पिटल होतं. पण ही तर कुठे सुरुवात होती या रुग्णाच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवाच्या फेऱ्यांची. या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मात्र या रुग्णाचे नमुने चाचणीसाठी एनआयव्हीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आणि ज्याची दबक्या आवाजात  भीती व्यक्त होती ते खरं ठरलं. या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एक नव्हे तर चार-चार हॉस्पिटलमध्ये हा रुग्ण उपचारांसाठी जाऊन आलेला असल्याने खळबळ उडाली. आरोग्य यंत्रणा कामाला लागली. या रुग्णाचे आई-वडील, बायको आणि अकरा वर्षाच्या मुलाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये हे सगळे कुटुंबीय कोरोना निगेटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या या रुग्णाला उपचारादरम्यान कुठल्या तरी हॉस्पिटलमध्येच कोरोनाची लागण झाल्याची शक्यता बळावली.


या रुग्णावर उपचार सुरु आहेत. मात्र जिथे उपचार सुरु आहेत त्या हॉस्पिटलने पुढच्या उपचारांसाठी पैशांची मागणी केली आहे. आता हे पैसे कोरोनाच्या उपचारांसाठी किती आणि पायाच्या ऑपरेशनसाठी किती आणि ते कुणी भरायचे याचा घोळ सुरु आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी हॉस्पिटलशी बोलून यातून मार्ग काढू असं म्हणत आहेत. पण या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.