पिंपरी-चिंचवड : बिबट्या म्हटलं की नजरेसमोर येते चपळाई, डरकाळी, त्याचे हल्ले आणि भीती. प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याला ही कोरोनापासून धोका आहे. म्हणूनच त्याला ही कोरोनाच्या उपाययोजनांना आज तोंड द्यावं लागतंय. विशेष म्हणजे कोरोनाच्या महामारीनंतरचे बदल त्याने ही स्वीकारलेत.


बघताच क्षणी अंगात धडकी भरवणाऱ्या, भल्याभल्यांची पळता भुई करणाऱ्या बिबट्याला ही कोरोना पासून धोका आहे. म्हणूनच पुण्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील बिबट्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. दिवसातून तीन वेळा स्क्रिनिंग करून त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळतायेत का? याचं मॉनिटरिंग केलं जातं. खुराक उकळून दिला जातोय. सोबतच विविध उपाययोजना इथं राबवल्या जात आहेत. तसंच खबरदारी म्हणून पाच विलगीकरण पिंजरे ही सज्ज ठेवण्यात आलेत.


कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून परगावातून आपल्या गावात एखादी व्यक्ती आली की, त्यास कॉरंटाइन केलं जातं. अगदी त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यात गुरुवारी जेरबंद केलेल्या बिबट्याला या निवारा केंद्रात आणताच कॉरंटाइन केलं गेलं. कोरोनाशी निगडित त्याची वैद्यकीय तपासणी ही सुरू आहे. न्यूयॉर्कमध्ये वाघाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर महाराष्ट्रातील बिबट्यांचा जीव ही धोक्यात येण्याची शक्यता होती. त्यांना वाचवण्यासाठी या उपाययोजना राबवल्या जात आहेत. नेहमीच रुद्रावतार धारण करणारे हे बिबटे आज मात्र कोरोनाच्या उपाययोजनांसोबत जगत आहेत. जगण्यासाठी मुक्या जनावरांनी हा बदल स्वीकारला पण मनुष्य प्राणी आजही पळवाटा शोधत आहे.


संबंधित बातम्या :



कोरोना रोखण्यासाठी आम्ही विनामोबदला दारू घरपोच करू; सांगलीतील संघटनेचा पुढाकार