सांगली : दारू विक्रीला राज्यात परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात दुकांनांसमोर तळीरामांची गर्दी दिसत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी विनामोबदला दारू घरपोच देण्याची तयारी सांगलीतील एका संघटनेने दर्शवली आहे. सांगली, मिरज, कुपवाड मनपा क्षेत्रात दीड महिन्यापासून घरपोच भाजीपाला पोचवणाऱ्या शहरातील जनसेवा फळे भाजीपाला विक्रेता संघटनेने यासाठी पुढाकारा घेतला आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तशी परवानगी द्यावी किंवा स्वतःच्या यंत्रणेमार्फत दारू घरपोच करावी, अशी मागणी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी केली आहे.


लॉकडाऊन मध्येवाईन दारू विक्रीला शिथिलता मिळाल्याने वाईन शॉपसमोर भली मोठी रांग दिसून येत आहे. ही दारूसाठी असलेली रांग नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पोलीस वाईन शॉपसमोर नेमावे लागत आहेत. यामुळे आधीच ताण असलेल्या सर्व यंत्रणेवर अधिक ताण पडला आहे. गेले दीड महिना सांगली जिल्ह्याचे प्रशासन आणि शहरातील व्यापारी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जनसेवा संघटना लोकांना सामान्य दरामध्ये भाजी घरपोच करण्याची सोय प्रशासनाने परवानगी दिलेल्या 111 भाजीपाला वाहनांद्वारे करीत आहे. मात्र, दारुसाठी झालेली गर्दी आणि भर उन्हात तासनतास लोकांना उभे करायला लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाने होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचारच केला नव्हता. त्यामुळे दीड दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आणि अजूनही तीन दिवसानंतर त्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. 5 फूट अंतरावर एक व्यक्ती उभा करण्याचे धोरण जाहीर झाले असेल आणि दुकानाच्या दारात काठ्या बांधल्या असल्या तरी ते पाळले जाईल, असे कुठेही दिसत नाही.


कोरोना रोखण्यासाठी विनामुल्य सेवा द्यायला तयार आहोत


देशी दारूच्या दुकानावर तर सहाशे सातशे लोक एकमेकाला खेटून उभे असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. असेच सुरू राहिले तर सांगली संकटात सापडायला फार वेळ लागणार नाही. जिल्हा प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी जनसेवा संघटनेने केली आहे. वास्तविक मद्य विक्रेत्यांना मागणीनुसार त्यांच्या परिसरात पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन उत्पादन शुल्क विभागाने करायला हवे होते. त्यांना जर ते शक्य नसेल तर महापालिका क्षेत्रात जनसेवा भाजीपाला संघटनेच्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गाड्या फिरत आहेत ते मोबदला न घेता केवळ कोरोना रोखण्यासाठी सेवा द्यायला तयार आहेत. मद्य विक्रेत्यांनी ऑर्डर आणि ऑनलाइन किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पैसे स्वीकारून मद्य ज्यांच्याकडे पोचवायचे त्यांचा पत्ता दिल्यास त्या त्या भागातील विक्रेते भाजीपाला बरोबरच या वस्तू ही पोहोच करतील. मद्य पुरवणे चांगले की वाईट या वादात न पडता केवळ गर्दी आणि लोकांचे हाल न होता कोरोनाचे संकटही टाळावे, या उद्देशाने आमची ही सेवा देण्याची तयारी आहे, असेही जनसेवाच्या पदाधिकाऱ्यानी म्हटले आहे.


Rajesh Tope on Corona | वेळ पडल्यास आर्मी, रेल्वेच्या रुग्णालयांची मदत घेणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे