पंढरपूर : सध्या धुमधडाक्यात विवाह करण्यासाठी अनेक उत्सुक असलेले कोरोनामुळे अडकून पडले आहे. मात्र माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील दोन अधिकाऱ्यांनी आपला विवाह चक्क शेतातील झाडाखाली करत एक आदर्श घालून दिला. उपळाई बुद्रुकची ओळखच अधिकाऱ्यांचे गाव अशी आहे. या गावाने राज्याला आणि देशाला अनेक प्रशासकीय अधिकारी दिले आहेत. सध्या कोरोनाचा कहर वाढत चालला असताना वनाधिकारी विशाल भागवत लोंढे यांचा विवाह कर निर्धारण अधिकारी भाग्यश्री बेडगे हिच्याशी ठरला होता. यातच देशभर कोरोनाची साथ सुरु झाल्याने आता विवाह कसा करायचा हा प्रश्न होता.
कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी कोणतेच औषध अद्याप सापडलेले नसले तरी सोशल डिस्टन्सिंग हाच एक उपाय असल्याने विवाहातील अडथळे या दोन्ही कुटुंबाला दिसत होते. यातच या विवाहातील वर आणि वधू हे दोघेही प्रशासकीय अधिकारी असल्याने कोरोनाची सुरु असलेली ड्युटी आणि विवाह याचे गणित कुटुंबियांना अवघड वाटू लागले होते. मात्र प्रशासकीय अधिकारी असल्याने दोघांनीही यातून अफलातून मार्ग काढत आपल्या शेतातील झाडाखाली 8 लोकात हा अनोखा विवाह केला. लॉकडाउनचे उल्लंघन आणि सोशल डिस्टन्सिंग याचे महत्व या दाम्पत्या इतके जास्त कोणाला समजणार होते आणि त्यांनी तेच महत्व आपल्या कुटुंबियांना समजावून हा अनोखा विवाहाचा प्रस्ताव ठेवला.
यातील वधु भाग्यश्री ही माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूकच्या रघुनाथ बेडगे यांची कन्या तर वर विशाल हा चिंचोली येथील भागवत लोंढे यांचा मुलगा. कोरोनाच्या परिस्थितीमुळे जमवलेल्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. मात्र कोरोनाचे संकट अजून किती दिवस राहणार याबाबत कोणीच सांगू शकत नसल्याने अखेर बेडगे व लोंढे परिवारने पूर्व नियोजित ठरलेले लग्न शासनाच्या आदेशाचे पालन करत शेतातील झाडाखाली करण्यास परवानगी दिली.
मग काय, ना बॅडबाजा, ना स्पिकर ना मंडप, ना वऱ्हाडी, केवळ घरातील चार-चार सदस्यांना घेऊन हा विवाह सोहळा निसर्गाच्या साक्षीने संपन्न झाला. अगदी विवाहाच्या वेळीही वर वधू सह उपस्थितांनीही तोंडाला मास्क लावून सोहळा केला. लग्न हे आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण असतो, त्यामुळे त्याच्या आठवणी वर्षनुवर्षे जपून ठेवण्यासाठी सर्वजण फोटो, शूटिंग सह अनेक प्रयत्न करत असतात. मात्र कोरोनाच्या संकटात हे सर्व विसरून निसर्गाला साक्षी ठेवून चार-चार कुटुंबियांच्या उपस्थितीत झालेला हा विवाह सर्वांच्याच कायम स्मरणात राहील. वनधिकारी असलेले विशाल लोंढे व कर निर्धारण अधिकारी असलेल्या भाग्यश्री बेडगे यांच्या या अनोख्या विवाहाचा आदर्श कोरोना जाण्याची वाट पाहत थांबलेल्या इतर विवाहोत्सुक दाम्पत्याने घेतल्यास त्यांना ताटकळत बसायची गरज उरणार नाही.
Raj Thackeray | लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? : राज ठाकरे