मुंबई : देशभरात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातही लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाला खिळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर लसउत्पादक कंपनी 'भारत बायोटेक'च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.


कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तिनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर औषधांचा पुरवठा सुरळीत रहावे तसेच सर्व रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी नियोजन करण्यात आहे. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरीकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठीच लसउत्पादक 'भारत बायोटेक'च्या प्लॅन्टसाठी पुण्यात जागा देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी आज दिली. 


दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाला आमदार राहूल कुल, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, यवतचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर (सर्वजण व्हीसीद्वारे) आदी मान्यवर उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. भारत बायोटेक कंपनीच्या प्लॅन्टला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन सुरु आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल. 


दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने देऊळगाव गाडा येथे विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटर सुरु केल्याने या परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.