पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. देशभरात आजपासून कोरोना लसीकरण सुरु झालं. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही आज लस टोचून घेतली आणि या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी झाले. लस घेतल्यानंतर कोणतेहे दुष्परिणाम जाणवत नाही हे अधोरेखित करण्यासाठी अदर पुनावाला यांनी लस टोचून घेतली. अदर पुनावाला यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.
त्यांनी लिहिलं आहे की, जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोविशील्ड या ऐतिहासिक प्रयत्नांचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. या लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी मी स्वत: लस घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सहभागी झालो.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारने या लसीच्या वितरणासाठी पहिली ऑर्डर दिली होती. सीरम इन्स्टिट्यूटकडून तब्बल एक कोटी दहा लाख इतके डोस पुरवण्यात आले आहे. एका डोसमागे दोनशे रुपये या दराने केंद्र सरकारने ही लस खरेदी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या कोविशील्ड लसीचे पाच कोटी डोस तयार आहेत. परंतु हे पूर्ण पाच कोटी न पुरवता सध्या पहिल्या टप्प्यात फक्त एक कोटी दहा लाख डोस पुरवण्याचीच ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे.
'दवाई भी, कड़ाई भी' : लसीकरण मोहीमेचा शुभारंभाच्या भाषणा पंतप्रधानांचा नारा
देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, येत्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. शिवाय लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक असून त्यानंतर दोन आठवड्यानंतर लसीचा प्रभाव जाणवेल, असंही त्यांनी सांगितलं. 'दवाई भी, कड़ाई भी', असा नवीन नारा यावेळी मोदींनी दिला.
'उत्तम लस म्हणजे तोंडावरील मास्क' : मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला. यावेळी लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत असं म्हणत त्यांनी एका नव्या आणि सकारात्मक उर्जेनं जनतेला संबोधित केलं. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस मिळाली असली तरीही सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावर असणारा मास्क, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मास्कचं महत्त्वं पुन्हा एकदा पटवून देत मास्कला अंतर देणं योग्य नसल्याचं सांगितलं. कोरोना काळात सुरुवातीच्या दिवसांमध्ये या संसर्गानं ज्या प्रकारे थैमान घातलं होतं, ते दिवस आठवताना या दिवसांमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या प्रत्येक कोविड योद्ध्याला मुख्यमंत्र्यांनी मानाचा मुजरा केला. कोरोना काळात मोलाचं सहकार्य देणाऱ्या टास्क फोर्स टीममधील डॉक्टरांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधार, म्हणून केला.