पुणे : खेड तालुक्यातील कोरोना बाधित महिलेला खाजगी रुग्णालयाने पाच दिवसांत डिस्चार्ज दिलं आहे. जिल्हा प्रशासनाला अंधारात ठेवल्याचं ही समोर आलंय. खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी तसा दावा केला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील यास दुजोरा दिला आहे.


पुण्यातील जहांगीर रुग्णालयाने हा प्रताप केलाय. जहांगीर रुग्णालयात काम करणाऱ्या पतीच्या संपर्कात आल्याने ही महिलेला कोरोनाची लागण झाली होती. 17 मे ला तसा अहवाल आल्यानंतर 21 मे च्या रात्री ही महिला खेड तालुक्यातील तिच्या घरी पोहचली होती. आधी पती पॉझिटिव्ह आला असताना तो घरी आला नव्हता मग ही कोरोनाबाधित महिला पाच दिवसांत घरी कशी परतली? असा प्रश्न उपस्थित झाला आणि ही बाब गावासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली.


ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. आरोग्य विभागाकडे याबाबत चौकशी सुरू झाली. ही बाब ऐकून जिल्हा प्रशासनाला ही धक्का बसला. जहांगीर रुग्णालयाकडे विचारणा झाली. तेव्हा संबंधित महिलेला कोरोनाची लक्षणं आढळत नसल्याने डिस्चार्ज दिल्याचं कारण देण्यात आलं. खाजगी वाहनाने या महिलेस घरी सोडण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. पण याबाबत जिल्हा प्रशासनाला अंधारात का ठेवण्यात आलं, यावर नेमकं रुग्णालयाने काय उत्तर दिलं हे मात्र समजू शकलेलं नाही. पण थेट जिल्हा परिषदेकडून प्रकरणाची चौकशी होऊ लागल्याने रुग्णालयाने रुग्णवाहिका पाठवून संबंधित महिलेस पुन्हा उपचारासाठी दाखल करुन घेतले,असा दावा खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी केला आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी याला दुजोरा दिलेला आहे.


डॉ. एसएस गिल ( जहांगीर रुग्णालय)
सरकारने 9 मे ला कोरोनाग्रस्त रुग्णाला डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवा अद्यादेश काढला होता. त्यानुसार आम्ही खेड तालुक्यातील महिलेला डिस्चार्ज दिला. कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल 17 मे ला आला होता, मात्र संबंधित महिलेला 11 मे पासूनच कोरोनाची लक्षणं आढळत होती. त्यानुसार दहा दिवस पूर्ण झाले तेव्हा कोरोनाची लक्षणं येत नव्हती. म्हणून रुग्णालयाने डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थानिक प्रशासनाला ही प्रक्रिया योग्य न वाटल्याने त्यांनी आक्षेप घेतले. आम्हाला ही कोणता वाद निर्माण करायचा नव्हता म्हणून पुन्हा रुग्णाला भरती करून घेण्यात आले.


संबंधित बातम्या :