मुंबई: ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणी  (Sasoon Hospital Drug Racket) कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित ललित पाटील (Lalit Patil ) प्रकरण विशेष तपास यंत्रणेकडे किंवा सीआयडीकडे (CID) सोपवावं अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) ललित पाटीलला आम्ही शोधून काढू असा विश्वास व्यक्त केला आहे. 


ललित पाटील प्रकरणावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ललित पाटीलचे सहकारी सापडले आहेत. आता त्यालाही शोधू, तो जातोय कुठे? तर त्याचवेळी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी ललित पाटीलला पुणे पोलीस शोधतील काय यावर शंका व्यक्त केली आहे.


जिल्हा पातळीवर समित्या स्थापन


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही दिवसांपूर्वी क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स घेतली होती. तेव्हा सर्व अधिकाऱ्यांना ड्रग्सवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. सर्व अधिकाऱ्यांनी त्याबद्दल काय कारवाई केली पाहिजे याचे निर्देश दिले होते. मुंबई पोलिसांनी त्याबद्दल कारवाई सुरू केली आहे, आता हळूहळू राज्यातील सर्व ठिकाणच्या पोलीस त्याबद्दल कारवाई करत आहेत. केंद्र सरकारही त्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. जिल्हा पातळीवर समित्या स्थापन केल्या असून त्या समित्या कारवायांवर लक्ष ठेवून आहेत. 


Ravindra Dhangekar Letter To CM Eknath Shinde : रविंद्र धंगेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


कुख्यात ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी पुण्यातील कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा लावू शकतील का याबाबत शंका धंगेकर यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. तसेच ललित पाटील प्रकरण सी.आय.डी कडे सोपवावं अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. 


ललित पाटील ससून रुग्णालयातून पलायन करून 14 दिवस उलटले तरी देखील पुणे पोलिसांच्या तपासात कोणतीही प्रगती दिसत नाही. या ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असं रविंद्र धंगेकरांनी म्हटलं आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा लावू शकतील का याबाबत शंका वाटते त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून तो विशेष तपास अथवा सी.आय.डी कडे सोपवावा अशी मागणीही त्यांनी केली.


ही बातमी वाचा: