पिंपरी चिंचवड : लॉकडाऊनमुळे परिस्थिती बदलेली आहे. व्यवसाय करायचा म्हटलं तर आता तुम्हाला थेट ग्राहकांशी कनेक्ट व्हावं लागणार आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी शहरातील ग्राहकांशी असंच थेट कनेक्ट झाले. बघता-बघता त्यांनी कंपनी ही स्थापन केली आणि अवघ्या साडेतीन महिन्यांत तीन कोटींची उलाढाल ही झालीये.


लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी किसान कनेक्ट या कंपनीची स्थापना केली. पुण्यातील मंचर आणि अहमदनगर येथील खडकी वाकी अशा दोन ठिकाणाहून शहरात पुरवठा सुरू झाला. 9 एप्रिलला मुंबईत पहिली ऑर्डर पार पडली आणि अवघ्या साडेतीन महिन्यातच कंपनी तब्बल तीन कोटींची उलाढाल करण्यात यशस्वी ही ठरलीये. यानिमित्ताने शेतकरी थेट पुणे-मुंबई आणि नाशिक शहरवासीयांशी कनेक्ट झालाय. शेतकऱ्यांच्या फळ-भाज्या खरेदी करून त्या शहरवासीयांपर्यंत पोहचवणारे मॉल्स आणि ऑनलाईन कंपन्या लॉकडाऊनमध्ये बंद झाल्या आणि शेतकरी अडचणीत आला. मग शेतीत गुंतलेले उच्चशिक्षित तरुण एकत्र आले आणि किसान कनेक्ट कंपनीचा उगम झाला.


लॉकडाऊनमुळे नामांकित मॉल्स आणि ऑनलाईन कंपन्या बंद झाल्याने, त्यांनी मागणी थांबवल्याचं मनीष मोरे सांगतात. एमबीए आणि एमएससी ऍग्रीची पदवी घेतलेले मनीष हे मॉल्स-ऑनलाईन कंपन्या आणि शेतकऱ्यांमधील दुवा म्हणून काम पाहतात. त्यामुळे साहजिकच कंपन्यांनी हात वर करताच शेतकरी मोरेंसमोर अनेक प्रश्न उभे करू लागले. अशातच मुंबईतील एका मित्राने जुन्नरच्या टोमॅटोचे दर विचारले. 7 ते 8 रुपये प्रति किलो असं सांगताच मित्र अवाक झाला. मुंबईत तेच टोमॅटो 80 रुपये प्रति किलो दराने ते खरेदी करत होते. मुंबईच्या मित्राने शेतकऱ्याच्या फळ-भाज्या मुंबईत पाठवण्याची मागणी केली. मनीषने इतर उच्चशिक्षित शेतकरी मित्रांची मदत घेतली आणि मुंबईत एक गाडी फळ-भाज्या पोहचल्या. मुंबईकरांनी ही त्याला प्रतिसाद दिला अन हजारो रुपये घेऊनच ते घरी परतले. इथूनच किसान कनेक्ट कंपनीच्या शुभरंभाचा पाया रोवला गेल्याचं मनीष सांगतो.



संगणक अभियंता झालेला पण शेतीतच रमलेला नकुल दंडवते ही या संकल्पनेशी जोडला गेला. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत नकुल गेली काही वर्षे शेतीत रमलेला आहे. पण या लॉकडाऊनमुळे तो ही चिंतेत होता, मात्र तो डगमगला नाही. कुटुंबियांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. अहमदनगरच्या राहता येथील नकुलने शेतकरी मित्रांशी चर्चा केली आणि पुढे कंपनीचा श्रीगणेशा झाला.


हे उच्चशिक्षित शेतकरी व्हाट्सअॅपच्या माध्यमातून आधीच एकमेकांशी जोडले गेले होते. त्यांनी पुणे-अहमदनगर आणि नाशिक या त्यांच्या जिल्ह्यातील 480 शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं आणि लॉकडाऊनमध्ये सर्वांचं नंदनवन झालं. पपई, ड्रॅगन फ्रुट आणि अद्रकची पिकं घेणारे अहमदनगरच्या राहता येथील उच्चशिक्षित शेतकरी चंद्रकांत डोगसवळे लॉकडाऊनमुळे अडचणीत आले होते. तर तेथीलच तरुण शेतकरी शरद मुटे यांच्या शेतमालाला आधी व्यापाऱ्यांनी नाकारले अन नंतर कवडीमोल भाव दिला. अशात किसान कनेक्ट कंपनीने दारं खुली केली आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आले.


लॉकडाऊनमध्ये मॉल्स आणि ऑनलाईन कंपन्या बंद पडल्याने सोसायटी धारकांची फळ-भाज्या विना मोठी गोची झाली. याच सोसायटी धारकांसाठी किसान कनेक्ट हा नवा पर्याय उपलब्ध झाला. किसान कनेक्ट घरपोच ते ही सुरक्षित फळ-भाज्या पुरवत असल्याने, ते ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. पुण्याच्या मगरपट्टा येथील गौरी राजे म्हणतात कोरोनाच्या काळात फळ-भाज्या कुठून खरेदी करायच्या हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर होता. विक्री करणारे कोरोना पॉझिटिव्ह असले तर असा प्रश्न त्यांना भेडसावत होता. पण किसान कनेक्ट कंपनीमार्फत या प्रश्नांची त्यांना उत्तरे मिळत गेली. शेतकऱ्यांशी थेट कनेक्ट झालो, शिवाय ते खूप सुरक्षित आहे. कंपनीत पॅकिंग करताना मनुष्याचा कमी स्पर्श होतोय. त्यातच डिलिव्हरी देणारे ही स्वच्छता बाळगत असल्याने, कोरोनाचा धोका टळत आहे. त्यामुळं किसान कनेक्टचा पर्याय निवडल्याचं पिंपरी चिंचवडमधील सदानंद दातीर सांगतात.



पुण्याच्या मंचर आणि अहमदनगर मधील खडकी वाकी या दोन ठिकाणाहून फळ-भाज्यांचा पुरवठा होतोय. ऐन लॉकडाऊनमध्ये किसान कनेक्टने इथं सत्तावीस बेरोजगारांना रोजगार ही दिलाय. सेल्स सुपरवायझर शुभम कुमार लॉकडाऊनपूर्वी हडपसर येथील कंपनीत काम करत होता. पण लॉकडाऊनमध्ये कंपनी शटडाऊन झाली अन शुभम आर्थिक विवंचनेत आला. अशात किसान कनेक्टमधून फोन आला आणि शुभमने क्षणाचा ही विचार न करता होकार कळवला. शुभम सह मंचर आणि खडकी वाकी परिसरातील पुरुष आणि महिला इथं नित्यनेमाने कामाला येतायेत.


लॉकडाऊनच्या बंदीत संधी शोधणाऱ्यांना यश मिळवता येत. हे किसान कनेक्ट कंपनीने सिद्ध ही करून दाखवलं. बदलेल्या या परिस्थितीत अश्या अनेक संधी दडलेल्या आहेत, त्या तुम्ही शोधल्या तर यश तुमच्या मागे नक्की धावेल.