पुणे : शांत अन् निवांत असेलल्या पुणेकरांची आज चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून आले. पुण्यात (Pune) अचानक मुसळधार पावासाला सुरुवात झाली अन् बघता बघता रस्त्यांना नदीचे रुप प्राप्त झाल्याचं दिसून आलं. विजांच्या कडकडाटासह शहरातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला असून ढगफुटीसारखी (Rain) परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं. आज संध्याकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे पुण्यात ३१ ठिकाणी झडपडीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, या पावसानंतर जिल्हा प्रशासन व मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
पुण्यात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. अनेकांनी लागलीच पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आडोसा घेतला होता. 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वीही पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला होता. शहरातील धानोरी, कात्रज, विमान नगर परिसरात पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं
पुण्यात आज मुसळधार पावसाने पुणेकरांना चांगलंच झोडपल्याचं दिसून आलं. पुणे शहरातील रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी राज्यातल्या आजच्या दिवसातला सगळ्यात जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असून शिवाजी नगर, अलका टाकीज चौक, कोथरुड, कात्रज, सिंहगड रोड यासह अनेक परिसरात रस्ते तुंबल्याचं दिसून आलं. पुणे शहरातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पुणेकर 2 तास वाहतूक कोंडीने संतापले होते.
दरम्यान, हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार पावसाची नोंद
पुणे पाऊस मिमी मध्ये (7.15 वाजेपर्यत)
शिवाजीनगर एडब्लूएस: 103mm
सदाशिव पेठ: 93mm
कोथरुड: 91mm
सिंहगड रोड: 74mm
पाशाण: 65mm
बावधन: 48mm
बिबवेवाडी: 56mm
खराडी: 31mm
एनडीए: 41mm
वाघोली: 44mm
लोहगाव: 18.6 MM
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 9 ते 12 जून दरम्यान पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तोपर्यंत घराबाहेर पडू नये - पाटील
पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरु असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती आहे. तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केलंय. पुण्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण महापालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आवश्यक तेथे आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत.
चंद्रकांत पाटील यांचं आवाहन
पुण्यातील पहिलाच पाऊस ढगफुटीसारखा झाला असून पुण्यातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत, महापालिकेची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. या ढगफुटी सदृश्य परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, आपण काळजी करू नका. या सगळ्या नुकसानाची नुकसानभरपाई केली जाणार असल्याचे मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात ज्या ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती मिळताच, ही माहिती प्रशासनाला द्यायची असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा, असे आवाहनही चंद्रकांत पाटली यांनी पुणेकरांना केलं आहे.