पुणे: अजित दादांनी शब्द फिरवला असं म्हणत चिंचवडच्या समर्थकांनीचं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) घरचा आहेर दिलाय. चिंचवड विधानसभेत (Chinchwad Vidhan Sabha Election) महायुतीने भाजपच्या शंकर जगतापांना (Shankar Jagtap) उमेदवारी जाहीर केल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीने काही तासांतच बैठक बोलावत थेट अजित पवारांबाबत नाराजीचा सूर आळवला अन् दिवाळीपूर्वी महायुतीत बंडाचे फटाके फोडण्याचा ठराव केला. काहीही झालं तरी आम्हाला भाजपचा प्रचार करायचा नाही, त्यामुळं महाविकासआघाडी आमच्यातील ज्याला उमेदवारी देईल, आम्ही त्यांचाच प्रचार करु. अशी बंडाची भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. बैठकीत नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे या इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पुढची भूमिका जाहीर करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.
नाना काटे म्हणाले, चिंचवड मतदारसंघातील सर्व आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी सर्वजण एकत्र आहे. आज देखील आम्ही सर्व एक आहोत.आमच्यातील कोणीही एक उमेदवार उभा राहील त्याचे आम्ही काम करु... अजित पवारांनी आम्हाला मतदारांच्या संपर्कात राहण्यास सांगितले . त्यापद्धतीने आम्ही आमचे काम सुरू ठेवले. परंतु आज भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जाहीर झाला आहे. आम्हाला शब्द दिला होता तो फिरवला. आमची भूमिका ठाम आहे, आम्ही आमच्यापैकी एक उमेदवार देऊ आणि त्याच्यामागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहे.
...तर आम्हाला ठोस भूमिका घ्यावी लागेल
राजकीय भूमिका वेगवेगळ्या असतात. आम्हाला आमच्या पक्षासाठी योग्य निर्णय मिळाला नाही तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा दिला आहे. दोन दिवसात महाविकास आघाडीकडून निर्णय अपेक्षीत आहे पण तसा निर्णय नाही झाला तर आम्हाला ठोस भूमिका घ्यावी लागेल, अशी भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे.
आम्ही भाजपचे काम करणार नाही, अजित पवार गटाची भूमिका
आम्ही भाजपचे काम करणार नाही या मतावर आजही आम्ही ठाम आहे. दोन दिवसांत चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच अजित पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली.
शंकर जगतापांनी अखेर बाजी मारली
भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांना डावललं आणि दीर शंकर जगतापांना चिंचवड विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. दीर-भावजयाच्या राजकीय संघर्षात शंकर जगतापांनी अखेर बाजी मारल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. त्यानंतर अश्विनी जगतापांनी मी स्वतः प्रचारात उतरणार असल्याचं म्हणत कौटुंबिक राजकीय संघर्षांवर पडदा टाकला आहे. मात्र दुसरीकडे शंकर जगतापांसमोर पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधाला अद्याप सामोरं जायचं आहे.
हे ही वाचा :
चिंचवड विधानसभेमध्ये शंकर जगतापांची बाजी, अश्विनी जगतापांचं तिकिट कापलं, दिराचा प्रचार करणार का? म्हणाल्या, 'मी आधी...'