Pimpri Hording Collapses: पिंपरी चिंचवडच्या (Hording collapses) किवळेमध्ये जाहिरातीचे लोखंडी फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
पिंपरी- चिंचवडच्या रावेत भागात होर्डिंग कोसळलं होतं. होर्डिंग्जच्या खाली पंक्चरचे दुकान दबले गेले होते. त्यावेळी दुकानाजवळ सात ते आठ व्यक्ती होते. त्यातील 4 ते 5 जण दगावले आहेत. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना काल रात्री ही दुर्घटना घडली. पावसामुळं काही जणांनी पंक्चर दुकानाचा आडोसा घेतला होता. मात्र त्याचवेळी वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळं होर्डिंग खाली कोसळलं आणि पंक्चर दुकानात असणारे होर्डिंगखाली दबले गेले. यावेळी दुकानात उपस्थित असणाऱ्यांना गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चार जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवडच्या किवळेमध्ये जाहिरातीचे लोखंडी फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदोष मनुष्यवधाचा आणि अनधिकृत जाहिरात फलक लावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. याप्रकरणी जागा मालक यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. नामदेव म्हसुगडे असं या मालकाचं नाव आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बाकी तिघांचा अजूनपर्यंत शोध सुरु आहे.
आडोसा ठरला घातक; मृतांमध्ये ; चार महिलांचा समावेश
शोभा टाक, वर्षा केदारी, भारती मंचक, अनिता रॉय, रामअवध आत्मज अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत. तर विशाल यादव, रहमद अन्सारी, रिंकी रॉय ही जखमींची नावं आहे. या सगळ्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणं आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या कामाला प्राधान्य देत असल्याचं पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितलं आहे. या सगळ्या बचावकार्यासाठी आठ क्रेन आणि तीन जेसीबींची मदत घेण्यात आली होती. त्यासोबतच इतर अग्निशमन दलाचे अधिकारीदेखील उपस्थित होते.
संबंधित बातमी-
Sharad Pawar : अजित पवारांच्या राजकीय भूकंपांच्या चर्चा; शरद पवार कीर्तनात तल्लीन