Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit pawar)  राजकारणात भूकंप घडवणार, राष्ट्रवादी पक्ष फुटणार यावरून राज्यभर गदारोळ सुरू होतं मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार  (Sharad Pawar)  मात्र कीर्तनात तल्लीन होते. शरद पवार एखाद्या घटनेला अथवा चर्चांना कशा पद्धतीने हाताळतात, याचा कोणीच अंदाज बांधू शकत नाही, हे यावरुन दिसून आलं. 



आजदेखील राज्यात मोठा गदारोळ सुरू असताना आणि त्याच्या केंद्रस्थानी पुतणे अजित पवार असताना काका शरद पवार कीर्तनात तल्लीन झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी पहाटेच्या शपथविधीला अजित पवारांसोबत उपस्थित असणारे मावळचे आमदार सुनील शेळके ही पवारांच्या बाजूला बसून होते. पुण्यातील देहूत त्रैमासीक कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षणाच्या समारोपाच्या निमित्ताने ते देहूत आले आहे.  या प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थींनी कीर्तन सेवा केली. तब्बल एक तास शरद पवारांनी एकाग्रतेने हे कीर्तन ऐकलं आणि त्याला दाद ही दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे, तशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अशावेळी शरद पवार किर्तनात तल्लीन असल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.


 चर्चा केवळ तुमच्या मनात आहेत; शरद पवार


अजित पवार राजकारणात मोठा भूकंप करणार का?, असं विचारल्यास शरद पवार यांनी चांगलंच खडसावलं होतं. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप (BJP) यांच्या जवळीच्या चर्चा केवळ तुमच्या मनात आहेत, आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चांना अजिबात महत्व नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय चर्चांवर भाष्य केलं होतं.



आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत आणि पक्षातच राहणार; अजित पवार


अजित दादा भाजपात जाणार का? याच्या चर्चा दुपारपर्यंत रंगल्या होत्या. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले होते. आज काहीतरी घोषणा करतील अशा चर्चा सुरु असतानाच अजित पावारांनी पत्रकार परिषद घेत या चर्चेला तुर्तास पूर्णविराम दिला आहे. 'कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचे काम होत आहे. बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत आणि पक्षातच राहणार आहोत माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत. माझ्या सहकार्यांनाही अनेक प्रश्न विचारले जात आहे. आमचे आमदार माझ्याकडे त्यांची कामं घेऊन आले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.