Chandrakant Patil News: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil in Pune) यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे (Manoj Garbade) याच्यासह तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली होती. यानंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. गेल्या शनिवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडेनं पिंपरीमध्ये शाईफेक केली होती. या प्रकरणी मनोजसह तिघांना पोलिसांनी अटक केली होती. शाईफेक करणाऱ्या तिघांवर 307 कलमासह इतर कलमं लावण्यात आली होती. विरोधकांनी भाजपावर टीका केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न (307) हे कलम काल मंगळावारी कमी केले होते. राजकीय दाबापोटी हे कलम लावण्यात आल्याचे आरोपीचे वकील सचिन भोसले यांनी सांगितलं होतं.
मनोज हा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आहे. दरम्यान मनोजच्या सोबत विजय धर्मा ओव्हाळ आणि धनंजय ईचगज या दोन कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आलं होतं. या तिघांनाही आज जामिनावर सोडण्यात आलं आहे.
पिंपरीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर मनोज गरबडेनं शाई फेकली आणि तिथं घोषणाबाजी देखील केली होती. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं होतं. चंद्रकांत पाटील हे चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचा शुभारंभ करायला आले होते. कार्यक्रमस्थळी पोहचण्यापूर्वी मनोद गरबडेनं चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. एका पदाधिकाऱ्याच्या घरातून ते कार्यक्रमस्थळी निघाले होते. तेव्हाच मनोद गरबडेनं थेट त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली अन् त्यांनी महात्मा फुलेंच्या घोषणा दिल्या होत्या.
चंद्रकांत पाटील यांनी दिल्या होत्या सर्व कारवाया मागे घेण्याच्या सूचना
या प्रकरणानंतर राज्यभर वातावरण ढवळून निघालं होतं. मनोज गरबडेच्या समर्थनार्थ देखील सोशल मीडियावर मोहिम चालवली गेली होती. चंद्रकांत पाटील यांनी 12 तारखेला प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, घडलेल्या प्रकरणात कोणाविषयी काहीही तक्रार नाही. ज्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल केले, पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवरची निलंबनाची कारवाई केली होती आणि ज्या पत्रकारावरदेखील कारवाई करण्यात आली त्या सगळ्यांवरच्या कारवाया मागे घ्याव्या, अशी विनंती त्यांनी केली. तोंडावर शाईफेक झालेल्या प्रकरणावर काहीही मत नाही. या वादावर पडदा टाकत आहे. त्यामुळे हा वाद थांबवावा, अशीदेखील विनंती त्यांनी केली होती.
ही बातमी देखील वाचा