पुणे : शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारे महात्मा फुले यांची आज 131 वी पुण्यतिथी असून यानिमित्त पुण्यातील फुले वाड्यात महात्मा फुले समता पुरस्कराचे वितरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाचा पुरस्कार छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना देण्यात आला. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान भुजबळांनी आजच्या कार्यक्रमात अगदी हटके अशा शेरो-शायरीने विरोधकांवर टीका केलीच सोबतच महत्त्वाच्या विषयांवर वक्तव्यही केलं.
 
मोठ्या घडामोडीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी भुजबळ यांनी राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल बोलताना, 'सरकार सर्व संकटांवर मात करून चांगली कामगिरी करत आहे. तसंच कोरोनासारख्या जागतिक संकटावरही चांगल्याप्रकारे मात करत आहे.' असं भुजबळ म्हणाले. 


'आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करु नका'


भुजबळांनी आजच्या कार्यक्रमात शेरोशायरीने अगदी वेगळाच अंदाज दाखवला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या टीका आणि आरोपांबद्दल बोलताना, 'नहीं बदलते हम औरोके हिसाबसे, एक लिबास हमे भी दिया है खुदाने अपने हिसाबसे' अशी हटके शायरी केली. ज्यातून राजकारणातील त्यांच वजन दाखवायचा प्रयत्नच त्यांनी यावेळी केला. तसंच 'अजूनही माझ्या मागे अडचणी चालूच आहेत, त्यांना वाटतं मी याने घाबरेन पण असं होणार नाही' असंही ते म्हणाले.


'ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही'


कार्यक्रमात भुजबळांनी ओबीसी आरक्षणाबाबत वक्तव्य करताना,'आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही ओबीसी (Obc) जनगणना झालीच पाहिजे, असं म्हणतं त्यांनी गायींची, म्हशींची संख्या मोजतात अरे आम्हाला मोजा आम्ही 54 टक्के आहे आणि तुम्ही 27 टक्केच बघता' असंही म्हणाले. 


केंद्र सरकार गोष्टी बनवण्याआधी, विकत आहे -  भूपेश बघेल 


यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना मिळाला. दरम्यान यावेळी बघेल यांनी बोलताना केंद्र सरकारवर जबरदस्त टीका केली. बघेल यांनी, 'जे संविधान सर्वांना समान अधिकार देत आहे, तेच संविधान आता धोक्यात आले आहे, असं म्हणाले. कारण केंद्र सरकार रेल्वे विकत आहे, विमानतळ विकत आहे,  सर्वच गोष्टी बनवण्याच्या आधी विकण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे खाजगीकरण झाले तर आरक्षणाचा उपयोग होणारच नाही, असं बघेल म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha