पुणे : सोशल मीडियाच्या युगात लग्न सोहळ्यांचा ट्रेंड पूर्णतः बदलून गेला आहे. त्यातच आताच्या मुली लग्न मंडपात शानदार एन्ट्री करू लागल्या आहेत. कुणी बुलेटवर, ट्रॅक्टरवर, बैलगाडीत तर कुणी नाचत लग्नमंडपात एन्ट्री केलेली आपण बघितली. मात्र पुण्यातील एका नवरीला गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास करणं चांगलंच महागात पडलं आहे. तिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


भोसरी परिसरातील एका नवरी मुलीने चक्क स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून धोकादायकरितीने  दिवे घाटातून मंगल कार्यालयाच्या दिशेने  प्रवास केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या संकटातही विशेष काळजी घेत सध्या अनेक ठिकाणी छोटेखानी विवाहसोहळे पार पडत आहेत. परंतु या नववधूने लग्नासाठी जात असताना उत्साहाच्या भरात दिवे घाटातून चक्क मोटारीच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला. मात्र धोकादायक पद्धतीने अशी स्टंटबाजी करताना नवरी मुलीला आणि तिच्या कुटुंबियाला कायद्याचा विसर पडल्याचे दिसून आले.






सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालय गाठणाऱ्या नववधूवर लग्नाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनममध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नवरी मुलीसोबत तिच्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल झाला आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे अनेकजण रातोरात स्टार झाले. एका व्हिडीओ अथवा फोटोमुळे काहींना प्रसिद्धी मिळाली. त्यामुळेच आपल्यालाही प्रसिद्धी मिळावी यासाठी काहीजण कोणत्याही थराला जातात. मात्र असं करत असतात योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणे गरजेचं असतं. अन्यथा प्रसिद्धी मिळते पण हवीहवीशी नाही तर नकोशी वाटणारी.  


इतर संबंधित बातम्या