पुणे : भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. महिला डॉक्टरच्या रुममध्ये छुपे कॅमेरे बसवणारा दुसरा तिसरा कुणी नसून एक डॉक्टरच आहे. या प्रकरणी एका बड्या एमडी डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सुजीत जगताप असं 42 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. रुममध्ये कॅमेरे आढळल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला, त्यावेळी डॉ. सुजीत जगतापचं नाव समोर आलं. सुजीत जगतापचा हिराबाग परिसरात दवाखाना आहे.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार महिला डॉक्टर भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरात असणाऱ्या कॉर्टरमध्ये राहतात. 6 जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या होत्या. संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. यावेळी त्यांना घरातील वातावरण संशयास्पद वाटले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, घरातील कानाकोपऱ्यात पाहणी केली. पाहणीनंतर त्यांना जे आढळून आलं ते अत्यंत धक्कादायक होतं.
घरात पाहणी करताना त्यांना लाल लाईट चमकत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांनी संपूर्ण घरात पाहणी केली असता त्यांना बाथरूम आणि बेडरूममध्ये काही छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आलं. हा प्रकार पाहून संबंधित महिला डॉक्टरच्या पायाखालची जमिनच सरकली आणि त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली होती.