Viral Video एखाद्या सौदर्य स्पर्धेमध्ये अंतिम क्षणी होणारा बक्षीस समारंभ अर्थात किताब देतानाचे क्षण हे कायमच पाहण्याजोगे असतात. स्पर्धकांच्या भावना, चेहऱ्यावर असणारा आनंद असं सारंकाही त्या क्षणातं पाहायला मिळतं. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मात्र काहीसं विपरित चित्र पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आहे, मिसेस श्रीलंका या सौंदर्यस्पर्धेचा. 


काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मिसेस श्रीलंका या स्पर्धेच्या अंतिम फेरीला एक नाट्यमय वळण मिळालं. ज्यामध्ये विजेती म्हणून घोषित केल्यानंतर पुष्पिका डीसिल्व्हा नामक स्पर्धकाकडून तिच्या डोक्यावर ठेवण्यात आलेला मानाचा मुकूट हिरावून घेण्यात आला. 2019 ची विजेती कॅरोलिन जुरी हिनं पुष्पिका ही घटस्फोटीत असल्याचं म्हणत व्यासपीठावर सर्वांसमक्ष एक गौप्यस्फोट केला. 


'इथं एक नियम आहे की, तुम्ही विवाहित असणं अपेक्षित आहे. घटस्फोटीत नाही. त्यामुळं मी माझं पहिलं पाऊल हे म्हणतच उचलतेय की, हा मुकूट द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकाकडे जात आहे', असं जुरी सर्वांसमोर म्हणताना दिसत आहे. जुरी हे म्हणत इतक्यावरच थांबली नाही, तर त्यापुढं पुष्पिकाचा मुकूट हिरावून घेत दुसऱ्या सौंदर्यवतीला देण्यात आला. हे सारं पाहून पुष्पिकाच्या चेहऱ्यावर संताप आणि दु:ख अशा संमिश्र भावना पाहायला मिळाल्या. या प्रसंगानंतर ती व्यासपीठावरून तडक निघून गेली. 


राधिकाला पहिल्यांदा मासिक पाळी येताच आईनं दिलेली पार्टी 


सोशल मीडियावर कार्यक्रमातील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. ज्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी ही बाब स्पष्ट केली की, पुष्पिका ही तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे, पण ती घटस्फोटीत नाही. ज्यानंतर त्यांनी पुष्पिकाची माफी मागत तिला तिचा किताब परत दिला. मिसेस श्रीलंका या स्पर्धेचे संचालक चंडीमल जयसिंघे यांनी बीबीसी या वृत्तवाहिनीला यासंदर्भातील माहिती दिली. 






दरम्यान, व्यासपीठावर झालेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल आपण संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पुष्पिका डिसिल्व्हा यांनी केला.