Buldhana Accident : बुलढाण्यातील बस दुर्घटनेत अनेकांनी आपले लेकरं तर बाकी (Buldhana Accident) नातेवाईक गमावले. हा अपघात अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरणारा ठरला तर अनेक कुटुंबीयांचा आधार हिसकावून घेणारा ठरला. यातच वर्धातील तेजस पोकळेचादेखील मृत्यू झाला. इंजिनिअर असलेला तेजस नव्या नोकरीसाठी पुण्यात येत होता. मात्र नोकरीचा प्रवास सुरु होण्यापूर्वीच दुर्दैवाने त्याच्या आयुष्याचा प्रवास संपला.
वर्ध्याचा तेजस रामदास पोकळे हा अत्यंत हुशार आणि होतकरू मुलगा होता. वडील रोजमजुरी करीत असल्याने त्याच्यावरचं कुटुंबाचा संपूर्ण भार होता. औरंगाबाद येथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. पहिल्याच झटक्यात नोकरीच्या मुलाखतीत निवड झाली होती. काल ट्रॅव्हल्सने पुण्यात नोकरी लागल्याने जॉईन होण्यासाठी पुण्यात येत होता. वडिलांचे साधे फर्निचरचे दुकान होते. त्याच्या पश्चात आई वडील, एक बहीण आहे. आई वडिलांचा आधार होऊन नोकरीतून त्यांना सुखी ठेवण्याचं स्वप्न उराशी बाळगून निघालेल्या तेजसचा हा अखेरचा प्रवास ठरला. तो राहत असलेल्या परिसरात सर्वांकडूनच त्याच्या गुणवत्तेची प्रशंसा होतं असून त्याच्या अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं होती.
तेजसला एक बहीण आहे. त्याची आई घरकाम करते. वडील फर्निचरचं काम करतात. वडिलांनी आणि बहिणीने ट्रॅव्हल्सपर्यंत सोडून दिले. नव्या नोकरीमुळे आता कुठे पोकळे कुटुंबीयांची दरिद्री संपणार होती. तेजसला नोकरी लागल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. नोकरी आणि पहिल्या पगाराचं स्वप्न पोकळे कुटुंबीय रंगवत होतं. मात्र पहिला पगार येण्याआधीच विचित्र अवस्थेत लेकाचा मृतदेह घरी परत येणार आहे.
आईचा टाहो...
लेकाला नोकरी लागली म्हणून घरात आनंदाचं वातावरण होतं. घरातील मागील अनेक वर्षांपासून असलेली गरिबी तेजसच्या नोकरीमुळे दूर झाली असती. मात्र घरातील भावी कर्ताधर्ताच गेल्यानं शोक व्यक्त केला जात आहे. या ट्रॅव्हल्समध्ये वर्ध्याचे 15 ते 16 प्रवासी होते. त्याती काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तेजसचा मृत्यू झाल्याचं कळताच त्याच्या आईने टाहो फोडला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अनेकांची स्वप्नं पाण्यात...
विदर्भातून अनेक तरुण-तरुणी स्वप्न जगण्यासाठी विदर्भातील वेगवेगळ्या गावाखेड्यातून पुण्यात येतात. तब्बल 16 ते 18 तास प्रवास करुन त्यांना पुणे गाठायचं असतं. मात्र हाच प्रवास चांगला झाला तर कुठे स्वप्न पूर्ण करण्याकडे एक पाऊल पुढं सरकता येतं, नाहीतर याच प्रवासात असा घात झाला तर अनेकांची स्वप्नं फक्त स्वप्नच राहतात आणि कुटुंबातील अनेकांच्या डोळ्यात कायमचं पाणी देऊन जातात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :