Buldhana Accident :  बुलढाण्यातील बस दुर्घटनेनं पुण्यातील एका शिक्षकाच्या कुटुंबावर घाला घातला आहे. पती-पत्नी आपल्या मुलाला नागपूरला महाविद्यालयात सोडायला गेले होते. तिथंच मुलाला निरोप (Buldhana Accident ) दिल्यानंतर त्यांनी काढलेला अखेरचा फोटोही समोर आला आहे. फोटोत आई-वडील आणि मुलगा आहे, तर मुलीनं हा फोटो मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. कैलास गंगावणे असं शिक्षकाचं नाव असून ते पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावातील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विद्यालयात इंग्लिश विषय शिकत होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या कुटुंबियांशी संबंधित ही संस्था असून कैलास गंगावणे गेल्या 25 वर्षांपासून या विद्यालयात कार्यरत होते. मुलाला नागपूर येथील महाविद्यालयात सोडून परतत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला. यात पत्नी कांचन गंगावणे आणि मुलगी सई गंगावणे हिचा मृत्यू झाला आहे. 


अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दगावलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवणंदेखील अवघड झालं आहे. त्यामुळे मृतदेहांची डीएनए टेस्ट करुन ओळख पटवावी लागणार आहे. सरकारी यंत्रणा सध्या बसमधील प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचं काम करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, तर पंतप्रधानांनी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. 


घटनास्थळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोहोचल्यानंतर निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय झाल्यानंतर मृतदेह आमच्या ताब्यात देणार आहेत, असं कांचन गंगावणे यांचे भाऊ अमर काळे यांनी बोलताना सांगितलं आहे. ते सध्या बुलढाण्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 


सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. ती वैद्यकीय शिक्षण घेत होती. आई-वडील आणि मुलगी असा तिघांचाही फोन लागत नसल्याचं लक्षात आल्यानंतर आणि बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अमर काळे यांनी शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना या बसमधील लिस्टमध्ये आपले नातेवाईक असल्याचं कळलं आणि त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. यात सख्या बहिणीचं कुटुंब उध्वस्त झाल्याचं कळताच अमर काळे यांच्या पायाखालची जमीन हादरली. काळे आणि गंगावणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


Buldhana Accident : कसा झाला अपघात?


बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसनं पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्यानं बसनं वेगानं पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Buldhana Accident : दुर्घटनाग्रस्त बस आधी लोखंडी पोलवर आदळली, मग पलटी झाली अन् अचानक भीषण आग लागली; नेमका कसा घडला अपघात?