Pune Crime news : 'तुझी बहिण बॉयफ्रेंडसोबत फिरते', ( Pune Crime )असे मित्राला सांगितल्याने याचा राग मनात धरून चिडलेल्या बॉयफ्रेंडने प्रेयसीच्या भावाच्या मित्रावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील आकुर्डी येथील डी.वाय.पाटील कॉलेजच्या परिसरात ही घडना घडली आहे. रस्त्यावर शनिवारी रात्री पावणे 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  यशराज शेलार असं या तरुणाचं नाव आहे. अनिकेत गोरे असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये शनिवारी रात्री वार्षिक स्नेहसंमेलन होते. त्यामुळे जास्त विद्यार्थी जमले होते. यशराज शेलारची प्रेयसीही तेथे आली होती. यशराजच्या प्रेयसीच्या भाऊ हा अनिकेत गोरेचा मित्र आहे. अनिकेत सुद्धा तेथे आला होता. अनिकेतने यशराज आणि त्याची प्रेयसी अर्थात मित्राच्या बहिणीला एकत्र पाहिलं. त्यानंतर अनिकेतने त्याच्या मित्राला म्हणजेच यशराजच्या प्रेयसीच्या भावाला सांगितलं. याचा राग मनात धरुन आरोपी यशराज अनिकेतवर कॉलेज कॅम्पसच्या बाहेर रस्त्याच्या कडेला कट्ट्याजवळ हल्ला केला. या हल्ल्यात गोरे हा किरकोळ जखमी झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा शोध सुरू असून तो सध्या फरार झाले.


किरकोळ वादातून हल्ले


किरकोळ वादातून हल्ल्यांचं प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाने 'भाई' न म्हटल्याने गुंडांच्या टोळीने जीवे मारणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या टोळीने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन त्याला जखमी केले होते. पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना खडकीतील शिवाजी पुतळ्याच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती आणि चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.36 वर्षीय संतोष साळवे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन संकेत मारे ऊर्फ मेड्या, प्रफुल्ल ऊर्फ कान्या सोनवणे,  सोनू मारे या तिघांना अटक केली होती. त्यांच्यासोबतच महेश सुरेश पवार यांच्या अशा चौघांवर खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता. 


पुण्यात गुन्हेगारीत वाढ


पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहे. पुण्यात सध्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचं बघायला मिळत आहे. त्यात शहरात चुहा गॅंग आणि कोयता गॅंग चांगल्याच सक्रिय आहेत. कोयता गॅंगने तर शहरात धुमाकूळ घातला आहे.  पुण्यातील अनेक परिसरात या गॅंगने दहशत निर्माण केली आहे. या आणि यासारख्या अनेक गॅंगला आळा घालण्याचं पुणे पोलीसासमोर मोठं आव्हान आहे.