पुणे :  पुण्यामध्ये 27 वर्षानंतर विश्वचषकाचा (World Cup 2023) सामना होत आहे. आज भारत विरुद्ध बांगलादेश असा क्रिकेटचा सामना रंगणार (MCA Stadium) असून याच दरम्यान ब्लॅकने तिकीट विक्री करणाऱ्या दोघांना पिंपरीच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पकडलं आहे. रवी लिंगप्पा देवकर आणि अजित सुरेश कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून सहा हजारांची पाच तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. ती जास्त दराने विकली जात होती. एक तिकीट 12 हजार रुपयांना ब्लॅकने विकलं जात होतं. आरोपींकडून पाच तिकिटे (प्रत्येकी बाराशे रुपये), सात हजार रोख रक्कम असा एकूण 51हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


कोणत्याच सामन्याचे तिकिटं स्टेडियमवर मिळत नाही आहे. हे तिकिटं फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे. मात्र तरीही अनेक क्रिकेटप्रेमी तिकिटांसाठी स्टेडियमवर चकरा मारताना दिसत आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी मागील काही दिवस ब्लकने तिकिटं मिळत असल्याचं देखील समोर आलं आहे. 1200 चं तिकिट 8 हजार ते 10 हजारपर्यंत विकलं जात असल्याचं क्रिकेटप्रेमी सांगत आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 27 वर्षानंतर विश्वचषकाच्या सामन्याचा पुण्याला वाव मिळाला आहे. त्यामुळे पुण्यातील हजारो क्रिकेटप्रेमी आज भारताला चिअरअप करण्यासाठी गहुंजे स्टेडियममध्ये जाणार आहे. अनेक क्रिकेटप्रेमींनी आधीच तिकीटं बुक करुन ठेवली आहे. जेणेकरुन वेळेवर कोणतीही अडचण येऊ नये, मात्र ज्यांनी पूर्वी तिकीट काढलं नाही आणि त्यांना सामना बघायचा आहे, अशांना टार्गेट करुन तिकिटांची ब्लॅकमध्ये विक्री केली जात आहे. त्यामुळे अनेकांनी MCA आणि ICC यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 


सगळ्या सामन्यांची तिकीटं ऑनलाईन सुरु आहे. त्यातच तिकिटांची संपूर्ण जबाबदारी ही ICC कडे आहे. त्यामुळे तिकिटांसदर्भात MCA कडे कोणतीही माहिती नाही आणि त्याच्याशी MCA काहीही संबंध नाही, असं MCA कडून सांगण्यात आलं आहे. 


MCA मैदानावर किती सामने होणार? 


भारत विरुद्ध बांगलादेश – 19 ऑक्टोबर


अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका – 30 ऑक्टोबर


न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 1 नोव्हेंबर


इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स – 8 नोव्हेंबर


ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – 11 नोव्हेंबर


इतर महत्वाची बातमी-


IND vs BAN : पुणेकरांनो मॅच बघायला जाताय? मग वाहतुकीतील बदल जाणून घ्या, नाहीतर ट्रॅफिकने हैराण व्हाल!