Pankaja Munde : कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक प्रचार सध्या अंतिम टप्यात पोहचला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार केला जातोय. अनेक दिग्गज प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी आज जाहीर सभा घेण्यात आली होती. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं. त्याशिवाय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादावरही भाष्य केलं. शिवसेना नाव नसताना पक्ष कसा उभा करायचा हा उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्न असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
अजित पवारांच्या आरोपाला उत्तर -
लोकशाहीमध्ये काही प्रोटोकॉल असतात, ते पाळणं म्हणजे निर्दयी म्हणणे हे चुकीचं आहे, असे प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी अजित पवारांना दिलं. भाजपने जगताप आणि टिळक यांना मतदानासाठी मुंबईत बोलावून स्वार्थीपणा दाखवला, असा आरोप अजित पवारांनी केला होता.
आजारी असताना गिरीश बापट प्रचारात उतरले, काय म्हणाल्या पंकजा ?
खासदार गिरीश बापट यांची प्रकृती ठीक नाही. मात्र त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन मोलाचं असेल असं पक्षाला वाटलं. बापटसाहेबांना स्वतःच प्रचार करावासा वाटला असेल तर त्यात हरकत असायचं कारण नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
शिवसेनेवर काय म्हणाल्या पंकजा ?
या राजकीय परिस्थितीकडे मी नेहमीच कुतहुलाने पाहिलेलं आहे. माझे प्रत्येकाशी वैयक्तिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आत्ताचा काळ हा खूप कसोशीचा आहे. सरकार आल्यानं मुख्यमंत्र्यांकडे खूप अपेक्षा आहेत. त्यांच्यासोबत आलेल्यांना निवडून आणण्याची मोठी संधी आहे. त्यातून जनतेची सेवा करण्याचीही संधी आहे. दुसरीकडे शिवसेना हे नाव नसताना पक्ष पुन्हा उभं करण्याचं आणि मोठं करण्याचा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्या प्रश्नांची उत्तरं ते शोधतील आणि पुढे जातील. सध्या एकनाथ शिंदे आणि आमची युती आहे. त्याशिवाय सत्ताही आमची आहे. बहीण म्हणून जे बोलायचं ते त्यांच्यासोबत बोलेन, ते तुमच्यासमोर का सांगू. पण सल्ला देण्याइतकी मी मोठी नाही. मी सर्वांची लहान बहीण आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
अश्विनी ताईही वाघीण आहेत - पंकजा मुंडे
गोपीनाथ मुंडे जेंव्हा खासदार झाले, ते मंत्री झाले. तेंव्हा मी बाबांना म्हणाले आता माझं काम संपलं. पण त्यानंतर अवघ्या सतरा दिवसांत त्यांचं निधन झाले. तेंव्हा मला आणि कुटुंबाला जो धक्का बसला, त्यातून आम्ही जसं सावरत आहोत. तेच मला अश्विनी जगतापांकडे पाहून जाणवलं. त्यांनी ज्यापद्धतीने भाषण केलं, संयमीपणे बोलल्या. हे पाहून मला अभिमान वाटला. आज मी त्यांची बहीण म्हणूनच इथं आली आहे. त्यांना आमदार बनवून दिवंगत लक्ष्मण जगतापांना आदरांजली वाहणार आहे. मला आधी रणरागिणी म्हणायचे, बाबांचं निधन झाल्यावर मला वाघीण म्हणायला लागले. अगदी तशीच अश्विनी ताईही वाघीण आहेत. त्या वाघिणीसारख्या उभ्या राहिल्या आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
अश्विनी जगताप काय म्हणाल्या ?
लक्ष्मण जगतापसाहेबांना जाऊन दीड महिना होत आलाय. दरम्यान आमचं ज्यांनी सांत्वन केलं त्या सर्वांचे आभार मानते. पंधरा दिवसांत निवडणूक लागल्या. तेव्हा मी घाबरून गेले होते. आता निवडणूक लढण्याचा मोठा निर्णय घेणं माझ्यासाठी कठीण गेलं. कारण मी साहेबांचा कणा होते. शेवटी तुमच्या पाठिंब्याने मी निर्णय घेतला. म्हणूनच तुम्हा सर्वांना मी माझ्या माहेरची माझीच माणसं समजते. बंगला, गाडी या दुय्यम गोष्टी आहेत. त्या येतात अन् जातात पण साहेबांनी तुमच्यासारखी जनता कमावली आहे. तेच सर्व तुम्ही आज माझ्या पाठीशी उभे आहात. त्याबाबत मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. मला निवडून द्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा, असे अश्विनी जगताप म्हणाल्या.