BJP leader Kirit Somaiya : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शनिवारी पुण्यात शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले. त्यांमुळे त्यांना दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. संचेती रुग्णालयात जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधीर शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.  ही लोकशाही आहे की गुंडाराज, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 


किरीट सोमय्या यांना मारण्याचा डाव होता. एकजण त्यांच्यामागे दगड घेऊन धावत होता. हा जीवघेणा हल्ला होता.  सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच हल्ला करतायत. ही लोकशाही आहे की गुंडाराज आहे. पुणे महापालिकेची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? पुणे पोलीस काय करत होते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. सत्य कधीच लपणार नाही. अनिल देशमुखांनी सांगितलंय की अनिल परब बदल्यांची यादी घेऊन यायचे. उद्धव ठाकरेंचे नाव त्यात आले आहे, असेही पाटील म्हणाले. 


पुणे पोलिसांकडून स्वतःहून स्यु मोटो पद्धतीने या प्रकरणात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ. कारण ही दंगल होती. या सरकारला आम्ही न्यायालयात गेल्यावर प्रत्येकवेळी न्यायालयाने लथाडलय. भाजप गप्प बसणार नाही. किरीट सोमय्यांची केंद्र सरकारकडून देण्यात आलेली सी.आय.एस.एफची सुरक्षा व्यवस्था नसती तर त्यांना श्रद्धांजली व्हावी लागली असती, असेही पाटील म्हणाले.  






नेमकं काय झाले? 
कोरोना काळात पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु, या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी ते आज पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पुणे महानगरपालिकेत आयुक्तांनाही यावेळी सिरीट सोमय्या तक्रार देणार होते. परंतु, यावेळी सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. त्यामध्ये ते जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पुणे महानगर पालिकेच्या इमारतीसमोर एकच गोंधळ उडाला. 


दरम्यान, आता किरीट सोमय्या यांच्या प्रकृतीबाबत संचेती रूग्णालयाच्या डॉ. पराग संचेती यांनी माहिती दिली आहे. "किरीट सोमय्यांच्या मनगटाला मार लागला आहे. घाबरल्यामुळे त्यांचा ब्लड प्रेशर वाढला होता. परंतु, आता त्यांचा ब्लड प्रेशर नॉर्मल झाला आहे. त्यांना फ्रॅक्चर झालेले नाही. मुक्का मार लागला आहे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत त्यांना संचेती रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात येईल आणि त्यानंतर डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉ. पराग संचेती यांनी सांगितले.