पुणे : दोन भावांनी आपापसातील भांडणं संपवून कधीतरी संबंध निर्माण करावे लागतात. राजकारणात कोणतीही शक्यता एका क्षणात बदलते. भाजप आणि शिवसेनेशी (Shiv sena) युती कधीही शक्य आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. शिवसेना आणि भाजपमधील पूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बांधावा, या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा साद घातली आहे. पिंपरी चिंचवडमधील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


चंद्रकांत पाटील म्हणाले, "राजकारणात कोणतीही शक्यता एका क्षणात निर्माण होते. 2014 मध्ये भाजप- शिवसेना युती झाली नाही. परंतु आम्ही सत्तेत एकत्र आलो. राजीनामे खिशात होते त्यामुळे रोज सरकार पडेल असं वाटायचं. परंतु, प्रत्यक्षात तसं झालं नाही, सरकार पाच वर्षे चाललं. त्यामुळं राजकारणात कधी काही होईल सांगता येत नाही. पण सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे की दोन भावांची भांडणं संपवून पुन्हा एकदा संबंध निर्माण करावेत. पण असं आम्ही म्हटलं की सामनामध्ये अग्रलेख येतो, यांना सत्ता नसल्याने झोप लागत नाही. पण आम्हाला शांत झोप लागते, उलट आम्हाला उठवावं लागतं."
 
"शिवसेनेमधील अस्वस्थता हळूहळू बाहेर पडत आहे. माजी मंत्री तानाजी सावंत, शिवसेना नेते रामदास कदम, अब्दुल सत्तार यांनी मनातील बोलायला सुरूवात केली आहे. काही जण खासगीतही बोलल आहेत. खऱ्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरे दाबून ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना हिंदुत्वाकडे जावंच लागेल. त्यातूनच अशी वक्तव्य उघडपणे बोलली जातात" असे म्हणत रामदास कदमांप्रमाणे आशीर्वाद घेणाऱ्यांची खूप मोठी यादी आहे. ही यादी खासगीत सांगतो अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.  


लॉकडाऊनवर कोणाचीच सहमती होणार नाही
कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात निर्बंध आणि लॉकडाऊनवर चर्चा होत आहेत. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "कडक निर्बंधांना कोणाचा विरोध नाही. परंतु, लॉकडाऊनला कोणाचीच सहमती होणार नाही. गेल्या दोन वर्षात लोकांनी खूप सहन केले आहे. त्यामुळे सगळं सुरू ठेवायचं पण निर्बंध कडक ठेवायचे आणि त्याची अंमलबजावणी करून घ्यायची. जसं  मास्क न घातल्यास 500 रुपये दंड, पाचशेचा पाच हजार दंड करायचा. परंतु असं करून सर्व सामान्यांना मेटाकुटीला आणाल. त्यामुळं कडक निर्बंध लावा, पण हे बंद ते बंद असं करणं योग्य नाही. कोरोना आता संपण्याच्या दिशेला आहे. त्यामुळे त्याचं स्वरूप भयावह नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 


धनंजय मुंडेंच्या सेल्फीला समर्थन
कडक निर्बंध सर्वांनीच पाळायला हवेत. परंतु, दुर्बीण घेऊन बसण्याचं काही कारण नाही. शेवटी राजकीय, सामाजिक कार्यकर्त्याला दिवसभरात अनेक ठिकाणी उपस्थिती लावावी लागते. त्याने जर तिथं सेल्फी काढली नाही तर त्यावेळीही टीका होते. हा जास्त शहाणा झाला, सेल्फी पण काढू देत नाही. शेवटी राजकीय नेत्यांना कामे करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नेहमी दुर्बीण घेऊन बसण्याचं कारण नाही. पण नियम सर्वांनी पाळायला हवेत. असे छोटे कार्यक्रम करावे लागतील. मोठे कार्यक्रम बंद करावेत असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्क केले. 


सुनील शेळकेंना बक्षीस मिळणार आहे क? 
कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही तर नागरिकांना क्वारंटाईन करणार, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दिला होता. सुनील शेळके यांच्या या वक्तव्यावरही चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले,  लोक दुसरा डोस का घेत नाहीत हे समजत नाही? विदेशात दोन डोस घेणाऱ्यांना बक्षीस दिलं जातंय, हे कशासाठी? तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी असायला पाहिजे. पण दुसरीकडे अशी बळजबरी करून चालणार नाही. आता सुनील शेळकेंची पैलवानी स्टाईल आहे, त्यामुळं ते म्हणतात. पण लोकांनी तसं म्हणायची स्थिती निर्माण केली आहे. तीस टक्के लोक डोस घेण्यापासून कसे काय राहतात? सुनील शेळकेंना काय बक्षीस मिळणार आहे का? दीड कोटी लस राज्यात पडून आहेत. त्यामुळे लोकांनी डोस घ्यायला हवेत असे पाटील म्हणाले.  


महत्वाच्या बातम्या