मुंबई :  मुंबईतील अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर वर्सोवा पोलीस ठाण्यात पिंपरी चिंचवड येथे राहणारी पल्लवी गायकवाड आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वर्सोवा पोलिसांनी पल्लवी गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, संजीव सोनवणे आणि प्रतीक गायकवाड विरुद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमेरिकेतून लग्नासाठी आलेल्या मिलिंद बोरकर यांनी साखरपुडा मोडल्यानंतर 6 महिन्यांसाठी लग्न करून घटस्फोट देणं आणि 25 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी आणि पैसे न दिल्यावर खोट्या केसमध्ये फसवण्याचा आरोप पल्लवी गायकवाड आणि तिच्या कुटुंबियांवर आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण ?


मिलिंद बोरकर 2007 पासून अमेरिकेतील एका प्रसिद्ध कंपनीत काम करत होता. आपल्या कारकिर्दीत ठसा उमटवल्यानंतर मिलिंदने भारतात येऊन भारतीय मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आवडत्या मुलीचा शोध फेब्रुवारी 2019 मध्ये संपला. जेव्हा मिलिंदला पुण्यातील पिंपरीतील मोरवाडी भागातील पल्लवी गायकवाड नावाची मुलगी मॅट्रिमोनी साईटवर भेटली. मॅट्रिमोनी साईटवर झालेल्या संभाषणामुळे दोघे जवळ आले. 16 एप्रिल 2019 रोजी मिलिंद भारतात आला आणि ऑनलाईन भेटल्यानंतर पहिल्यांदा पल्लवीला भेटला. घरच्यांच्या संमतीने दोघांच्या लग्नाचा निर्णय झाला. मिलिंद आणि पल्लवी यांची 2 जून 2019 रोजी एका कार्यक्रमात एंगेजमेंट झाली.  एंगेजमेंटनंतर मिलिंदने मुंबईहून अमेरिकेच्या घरी लग्नाची तयारी सुरू केली.


मिलिंद बोरकर यांच्या तक्रारीनुसार, लग्नाच्या तयारीदरम्यान मिलिंदला पल्लीवीच्या मोबाईल फोनमध्ये तिचे इतर तरुणांसोबतचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ सापडले. हे पाहून मिलिंदला धक्काच बसला आणि त्याने पल्लवीला अशा अवैध संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला देत लग्न रद्द केले. आरोपानुसार साखरपुडा तोडल्यानंतर पल्लवीच्या कुटुंबीयांनी मिलिंदकडे पल्लवीशी 6 महिने लग्न करण्याची आणि त्यानंतर घटस्फोट किंवा 25 लाख रुपयांची मागणी केली. मिलिंदला खोट्या खटल्यात अडकवण्याची आणि तसे न केल्यास त्याचे करिअर बरबाद करण्याची धमकी दिली.


पल्लवीने लग्न न केल्याने आणि 25 लाख रुपये न मिळाल्याने मिलिंदविरुद्ध पिंपरी, पुणे येथे गुन्हा दाखल केला.हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही.पल्लवी गायकवाडने 2019 मध्ये मिलिंदच्या यूएसमधील कार्यालय तसेच भारतीय आणि अमेरिकन इमिग्रेशनला खोटी माहिती पाठवली होती की त्या वेळी एफआयआर नोंदविला गेला नसतानाही मिलिंदवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मिलिंदने दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करू नये, यासाठी पल्लवीने त्यांच्या लग्नाची बाब प्रसिद्ध केली.
 
मिलिंदने मुंबईच्या अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टातून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को सुपीरियर कोर्टात याचिकाही दाखल केली आणि फोटो, व्हिडिओ, व्हॉट्सअॅप चॅट्स, कॉल रेकॉर्डिंग्ज सादर केल्या. या याचिकेनुसार, 21 जुलै 2019 रोजी साखरपुड्या दरम्यान, मिलिंदला पल्लवीचे दुसऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली.अंधेरी कोर्टातून अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को सुपीरियर कोर्टात आपल्या याचिकेत मिलिंदने आरोप केला की, पल्लवीने लग्नाची खोटी कथा रचून त्याचे करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.


प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर अंधेरी न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्सोवा पोलिसांनी पल्लवी गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, संजीव सोनवणे आणि प्रतीक गायकवाड यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.  मिलिंद बोरकर यांच्यावर खोटा एफआयआर नोंदवल्याप्रकरणी पुण्यातील पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.  मुंबई पोलिसांच्या वर्सोवा पोलिसांपाठोपाठ आता पुण्याचे पिंपरी पोलिसही पल्लवी गायकवाड आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पल्लवी गायकवाडसह अन्य आरोपींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.