पुणे: पुण्याचं पालकमंत्रिपद गेल्यानंतर भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची खदखद आता बाहेर आली आहे. मला पालकमंत्री म्हणून अतिशय जवळचे दोन जिल्हे देण्यात आले, काही नवीन आलं की माझ्या डोक्यावर टाकलं जातं असं वक्तव्य त्यांनी केलं. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्रिपदावरून बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला पालकमंत्री म्हणून अत्यंत जवळचे दोन जिल्हे देण्यात आले आहेत. सोलापूर इथून दहा किलोमीटर, तिथून अमरावती पाच किलोमीटर, पुणे तिथून अर्धा किलोमीटर आणि कॅबिनेटच्या बैठकीला मुंबईत येण्यासाठी शून्य किलोमीटर. असं काही माझ्याबद्दल गेल्या 40-45 वर्षांमध्ये केलंय. काही नवीन आलं की माझ्या डोक्यावर टाकलं जातंय.
चंद्रकांतदादांकडून अजितदादांकडे पालकमंत्रिपद
काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटलांकडे असलेले पुण्याचं पालकमंत्रिपद काढून घेण्यात आलं होतं आणि ते राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे देण्यात आलं होतं. अजित पवार जेव्हापासून सत्तेत सामील झाले होते तेव्हापासून त्यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह केला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटलांना सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आलं.
पालकमंत्रिपदाच्या या बदलानंतर चंद्रकांत पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पण काही मोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपण पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा त्याग करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. आता गमतीने का असेना त्यावर वक्तव्य करत चंद्रकांत पाटलांनी आपली खदखद बाहेर काढल्याचं म्हटलं जातंय.
सोलापुरात शाईफेक
सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन दिवसीय सोलापूर दौऱ्या असताना रविवारी त्यांच्यावर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. राज्य सरकारच्या नोकऱ्या या कंत्राटी पद्धतीने करण्यास विरोध करण्यासाठी ही शाईफेक करण्यात आल्याचं भीम आर्मीने म्हटलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली.
शाई फेकीची घटना घडल्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात त्यांनी देवदर्शनानी केली. सुरुवातीला सोलापूरचे ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर महाराजच्या मंदिरात जाऊन चंद्रकांत पाटलांनी दर्शन घेतले. त्यानंतर नवरात्रीनिमित्त सोलापुरातील रूपाभवानी देवीचे दर्शन देखील चंद्रकांत पाटील यांनी घेतले. चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते.
ही बातमी वाचा: